मुंबई : जगात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. हा धोकादायक विषाणू माउंट एव्हरेस्टमध्येही पोहोचला आहे. जगातील सर्वात उंच शिखराच्या बेस कॅम्पमध्ये कोरोना संसर्गाची पहिली घटना आढळली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये जगभरात 8 लाख 80 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, साडे तेरा हजाराहून अधिक बळी गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये संक्रमित सापडलेल्या नॉर्वेचा गिर्यारोहक अरलेड नेस याला हेलिकॉप्टरने काठमांडूला नेण्यात आले, तेथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेस यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 15 एप्रिलला ते पॉझिटिव्ह आले. गुरुवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली, ती नेगेटिव्ह आली. ऑस्ट्रेलियाच्या एका गिर्यारोहकाने असा इशारा दिला की, हा विषाणू एव्हरेस्टवर चढाई करणार्‍या शेकडो गिर्यारोहकांपर्यंत पसरू शकतो. त्यामुळे बेस कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्याची गरज आहे. 


नेपाळच्या पर्वतारोहण विभागाच्या संचालक मीरा आचार्य म्हणाल्या की, त्यांना कोणत्याही कोरोना प्रकरणाची माहिती नाही. नेपाळने यावर्षी 377 विदेशी गिर्यारोहकांना चढण्यास परवानगी दिली आहे. तर हिमालयीन देशात गेल्या 24 तासांत 3,117 नव्याने संक्रमित रुग्णांची वाढ झाली असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला.


जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी कोरोना रुग्णांची जागतिक आकडेवारी वाढून 14 कोटी 43 लाख 85 हजार 217 झाली आहे. तर मृतांचा आकडा 30 लाख 69 हजार 293 वर पोहोचला आहे.


एका दिवसात ब्राझीलमध्ये दोन हजार बळी


ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गुरुवारी देशात 45 हजार 178 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. यामुळे संक्रमित लोकांची एकूण संख्या 1 कोटी 41 लाख 67 हजार 973 वर गेली आहे. या कालावधीत 2,027 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या 3 लाख 83 हजार 502 झाली आहे.


जपान : पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढल्यानंतर टोकियो आणि तीन पश्चिम प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. हे पाऊल तिसऱ्यांदा घेण्यात आले आहे.


पाकिस्तान : गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 144 बळी गेले आणि 5,870 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे.


चीन : राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गुरुवारी 19 नवीन रुग्ण आढळून आल्याचा अहवाल दिला. हे सर्व परदेशातून आले आहेत. गेल्या 24 तासांत कोणताही मृत्यू झालेला नाही.


कोलंबिया : कोरोनामुळे 430 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 70 हजारांच्या पुढे गेला आहे. देशात एकूण 27 लाख 70 हजार जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.