मुंबई : कोरोनावर लस आली. आपल्यापैकी अनेकांनी अजून ती लस घेतली नसली तरी लवकरच आपण ती घेऊच... पण तोपर्यंत कदाचित कोरोना लसीचं स्वरूपच बदललेलं असेल... आणि कोरोना प्रतिबंधक लस घेणं भविष्यात आणखी सोपं होईल, कसं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्यापैकी काहींनी कोरोनाची लस घेतली असेल. 1 मार्चपासून खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. मात्र लसीचं इंजेक्शन घ्यायला तुम्ही घाबरत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कारण लवकरच गोळी किंवा स्प्रेच्या स्वरूपात कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. यूकेतील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ कोरोनाची गोळी तयार करण्यासाठी सध्या संशोधन करत आहेत.


ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनीच अत्यंत कमी वेळात कोरोनावरची लस शोधून काढली होती. त्यामुळं जगभरातून या शास्त्रज्ञांचं कौतुक होतं आहे. मात्र सध्याची लस इंजेक्श्न स्वरूपात असल्यानं कमी वेळेत जास्त उत्पादन करता येत नाही. त्यामुळंच कमीत कमी वेळेत संपूर्ण जगभरात लस उपलब्ध व्हावी यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ गोळी आणि स्प्रेच्या स्वरूपात लस निर्माण करण्याच्या तयारीला लागले आहेत.


कोरोना व्हायरस नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. काही दिवसांतच कोरोना व्हायरसचा श्वसनमार्गात संसर्ग होतो. आणि त्यानंतर तो फुफ्फुसांमध्ये पसरतो. मात्र तोंडात कोरोनाची गोळी बराच वेळ ठेवल्यास श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकतात, असं डॉक्टरांचं मत आहे. त्यादृष्टीनं लसीची गोळी तयार करण्याचा पहिला प्रयोग सुरू झाला आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्रॅजेनेका लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या प्राध्यापक साला गिल्बर्ट यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.


गोळीच्या स्वरूपातील लस तयार केल्यानंतर तिची सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची चाचणी होईल. इंट्रामस्क्युलर इंजेक्जन लसीपेक्षा कोरोनाची गोळी अधिक प्रभावी ठरेल, असा अंदाज आहे. मात्र त्यासाठी आणखी काही काळ जगाला वाट पाहावी लागेल.