मुंबई : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे जीवित आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या व्हायरसमुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला आली आहे. तशात आता जगाचं राजकारणही यामुळे अमुलाग्र बदलू शकतं असं मानलं जाऊ लागलं आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन आणि अमेरिकेतला तणाव वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरामध्ये कोरोना व्हायरसनं कहर केलेला असताना चीन आणि अमेरिकेमध्ये भलतंच राजकारण रंगलंय. या व्हायरसचा उगम नेमका कसा झाला, यावरून या दोन देशांमध्ये ब्लेमगेम सुरू झालाय.


चीनचे परराष्ट्रमंत्री झाओ लिजिआन यांनी अमेरिकन लष्करानं कोरोना व्हायरस वुहानमध्ये आणला असावा, अशी शंका ट्विटरवर व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत कोरोनाचा उल्लेख 'फॉरेन व्हायरस' असा करून अप्रत्यक्षपणे चीनकडे बोट दाखवलं. यावर कडी करत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या विषाणूचा उल्लेख 'वुहान व्हायरस' असा करून टाकला.


ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी युरोप-अमेरिकेतील प्रवास महिनाभरासाठी स्थगित केला. यामुळे युरोपियन युनियन संतप्त झाली आहे. युरोपातील देशांशी किंवा युनियनशी चर्चा न करता ट्रम्प यांनी परस्पर निर्णय घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.


अर्थात ट्रम्प यांनी याचा बचाव करताना घाईघाईत निर्णय घेणं आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला आहे. यामुळे युरोपची नाराजी दूर होणं अर्थातच शक्य नसताना चीननं आपत्तीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच कोरोनाचा फटका बसलेल्या इटलीला चीननं औषधांसह इतर साहित्य धाडून दिलंय तसंच स्पेनला मदतीची तयारी दाखवली आहे.


युरोपशी जवळीक साधण्याचा ड्रॅगनचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवण्याची ताकद कोरोना व्हायरसमध्ये आहे. कोरोनाचा प्रभाव ओसरेल तेव्हा कदाचित आपण नव्या जगात असू.