नवी दिल्ली : भारताकडून चीनी बनावटीच्या ५ लाख रॅपिड टेस्टिंग किटचं ऑर्डर रद्द करण्यात आलं आहे. या टेस्टिंग किट चाचणीत अचूक दिसून आल्या नाहीत. केंद्र सरकारने राज्यात पाठवलेल्या या किट्स परत मागवल्या आहेत. या किट्सने संक्रमित लोकांच्या रक्तातील अँटीबॉडीजचा शोध घेतला जात होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॅपिड टेस्टिंग किटमध्ये रिझल्ट येण्यासाठी ३० मिनिटं लागत होते. यातून अधिकाऱ्यांना एखाद्या ठिकाणी सुरू असलेल्या संक्रमणाचा वेगाने शोध घेणे सोपं होतं, असं म्हटलं जात होतं, पण या रॅपिड टेस्टिंग किट अचूक नसल्याचं सांगण्यात येत आहे.


कारण तसं पाहिलं तर रॅपिड टेस्टिंग किटमध्ये कोरोना व्हायरसची टेस्ट होवू शकत नाही, म्हणून शास्त्रज्ञांनी या किटच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले होते.


दुसरीकडे चीनने भारताचा दावा खोडून काढला आहे. चीनी दुतावासाचे प्रवक्त जे रोंग यांनी मंगळवारी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे, 'चीनकडून निर्यात केले जाणारे वैद्यकीय साहित्य दर्जेदार असतं, त्याच्या गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. काही व्यक्तींकडून चीनी उत्पादनात दोष असणे असं सांगणे, हे योग्य नाही तसेच हा पूर्वग्रहदुषित आणि बेजबाबदार दृष्टीकोन आहे.'


भारतातील काही राज्यांनी रॅपिड टेस्टिंग किटचा वापर केल्यानंतर, तक्रारी येत होत्या. या चाचणीच्या विश्वासार्हता फक्त ५ टक्के असल्याचंही पुढे येत होतं. राज्यांकडून आलेल्या माहितीनुसार, या किट्समधून या आधीच कोरोनाबाधित असलेल्या रूग्णांच्या टेस्ट देखील निगेटिव्ह आल्या.


या नंतर चीनी बनावटीचीही रॅपिड टेस्टिंग किट इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या टेस्टमध्ये नापास झाली. तसेच सोमवारी दिल्ली हायकोर्टाने हे देखील सांगितलं की, भारत टेस्टिंग किटसाठी जास्त पैसे देत आहे.