कोरोना : इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू, दक्षिण कोरियात नव्याने ३३४ जणांना लागण
चीनसह दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये प्रवेश केलेल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका बसला आहे.
लंडन : जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात थैमान घातलेल्या आणि सध्या चीनसह दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये प्रवेश केलेल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका बसला आहे. दक्षिण कोरियामधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय. नव्याने ३३४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इराणमध्ये कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्था कोरोनामुळे चिंतेत
सध्या जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंतेत पडली आहे. कारण कोरोनामुळे चीनसह अन्य देशांमधील आयात निर्यात मंदावली आहे. यामुळे विक्री संथ पडली असल्याचे पाहावयास मिळत आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा संख्या १,५९५ झाली आहे. यात नव्याने ३३४ नागरिकांना समावेश आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
इराणमध्ये रुग्णांची संख्या १३९
दरम्यान, इराणमध्ये कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांत ४४ जणांना लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे एकट्या इराणमध्ये आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या १३९ झाली आहे. तर चीनमधला कोरोना व्हायरस आता इटलीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. इटलीमध्ये या कोरोनामुळे १२ जण दगावलेत तर कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ३७४वर गेलीय. त्यामुळे इटलीमध्येही भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरले आहे.
चीनमध्ये अडकलेले ११९ भारतीय मायदेशात
तर दुसरीकडे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान भारतात दाखल झाले आहे. यामध्ये ११९ भारतीयांना घेऊन हे विमान भारतात दाखल झाले आहे. तर इतर शेजारी देशातीलही काही प्रवासी या विमानातून आले आहेत. महाराष्ट्रातील साताऱ्याच्या अश्विनी पाटील ज्या चीनच्या वुहानमध्ये अडकल्या होत्या त्याही याच विशेष विमानाने भारतात दाखल झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासाठी प्रयत्न केलेत.