Coronavirus : भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेतील नागरिकांकडून कडक सल्यूट
अशी केली कृतज्ञता व्यक्त
मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. आज प्रत्येक देश कोरोनाशी दोन हात करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आज डॉक्टर सर्वतोपरी काम करत आहेत. देव कुणी पाहिला नाही पण या कठिण प्रसंगी डॉक्टरचं देवासमान भासू लागले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांना एका भारतीय महिला डॉक्टरला कडक सल्यूट केलं आहे.
डॉ. उमा राणी मधुसूदन हा फिजिशिअन असून विंडसोर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. मैसूरच्या जेएसएस मेडिकल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं असून त्या मुळच्या भारतीय आहे. मंगळवारी डॉ. उमा यांची जगभर चर्चा झाली.
कोविड-१९ बाधित अनेक रूग्णांवर डॉ. उमा यांनी उपचार करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. याची कृतज्ञता म्हणून डॉ. उमा यांच्या राहत्या घरासमोर जवळपास २०० हून अधिक कार घेऊन बरे झालेले रूग्ण, रूग्णांचे नातेवाईक आणि पोलिस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत २०० हून अधिक कार डॉ. उमा यांच्या घराबाहेर आल्या. त्यांनी डॉ. उमा यांचे उपचाराकरता आभार मानले. या व्हिडिओत सगळ्यांनी सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळल्याचे दिसत आहेत. डॉ. उमा देखील आपल्या घराच्या आवारात एकट्याच उभ्या असलेल्या दिसल्या.