बीजिंग : चीनच्या वुहानमधून आलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. जगातल्या जवळपास ३० लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी यांनी चीनची कोरोना व्हायरसच्या स्त्रोतावरून तटस्थ आंतरराष्ट्रीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत दबाव वाढवला होता. चीनने मात्र अशाप्रकारे चौकशी करायला कोणताही कायदेशीर नाही, असं प्रत्युत्तर दिलं. तसंच याआधीही संसर्गजन्य रोगांच्या चौकशीचे कोणतेही ठोस निकाल आले नाहीत, असंही चीनने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी कोरोनाच्या स्त्रोताबाबत चीनने अधिक पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी केली होती. कोरोना व्हायरस वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमधून बाहेर पडला होता का? याची चौकशी झाली पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले होते. 


कोरोनाच्या संकटात चीनला बराच कालावधी प्रतिकूल परिस्थिती आणि आव्हानांना तोंड द्यायला तयार राहिलं पाहिजे, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाल्याचं वृत्त आहे.


'कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध विज्ञानाचा विषय आहे. याचं अध्ययन वैज्ञानिकांनी केलं पाहिजे. याआधी इतर व्हायरसबद्दल झालेल्या चौकशीतून काहीच समोर आलेलं नाही,' असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले.