बँकॉक : जगभरात कोरोना व्हायरसच्या संकटाने थैमान घातलं आहे. पण थायलंडचा राजा महा वाजिरालोंगकॉर्न आपला देशसोडून जर्मनीला गेला आहे. एवढच नाही तर राजाने जर्मनीमधल्या एका आलीशान हॉटेलमध्ये स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. राजासोबत या हॉटेलमध्ये २० महिलाही राहणार आहेत. माध्यमांमधल्या वृत्तानुसार राजा आपल्यासोबत काही नोकरही घेऊन गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थायलंडच्या राजाने आयसोलेशनसाठी जर्मनीमधल्या आलीशान अशा अल्पाईन रिसॉर्टची निवड केली आहे. आयसोलेशनमध्ये राजासोबत २० महिला आणि काही नोकर असतील. राजाच्या ४ पत्नी त्याच्यासोबत जर्मनीमध्ये असतील का नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.  


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बघता परिसरातली सगळी हॉटेल आणि रिसॉर्ट्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. थायलंडच्या राजाने जर्मनीत राहण्यासाठी तिथल्या प्रशासनाची विशेष परवानगी घेतली आहे.


कोरोना व्हायरसमुळे देश अडचणीत असताना राजा जर्मनीला गेल्यामुळे थायलंडची जनता संतापली आहे. सोशल मीडियावर राजाला जोरदार टीकेला सामोरं जावं लागत आहे. थायलंडमध्ये राजावर टीका करणाऱ्यांना १५ वर्ष जेलची शिक्षा दिली जाते. थायलंडमध्ये कोरोनाचे १२०० रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १ मार्चला थायलंडमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. 


थायलंडच्या राजाने मागच्या वर्षी राज्यभिषेक होण्याआधी आपल्या खासगी सुरक्षेमधल्या डेप्युटी कमांडरसोबत लग्न केलं. या आधीच्या तिन्ही बायकांना राजाने घटस्फोट दिला आहे. थायलंडच्या राजाला एकूण ७ अपत्य आहेत. ६६ वर्षांचा असलेला राजा महा वाजिरालोंगकॉर्न यांचे वडिल राजा भूमीबोल अदुलयादेज यांचं ऑक्टोबर २०१६ साली निधन झालं. राजा भूमीबोल यांच्या निधनानंतर वाजिरालोंगकॉर्न यांना सम्राट बनवण्यात आलं. वाजिरालोंगकॉर्नच्या वडिलांनी ७० वर्ष सिंहासन सांभाळलं होतं.