मुंबई : जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू आता जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचलाय. होय, कोरोनाचा कहर आता माऊंट एव्हरेस्टवर जाऊन पोहोचलाय. (COVID-19 cases rising at Mount Everest ) कोरोना विषाणूने हाहाकार उडावला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. जगात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच कोरोनाची संख्या वाढत असताना कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एव्हरेस्टवर चढाईसाठी निघण्यासाठी उभारण्यात आलेल्या बेस कॅम्पमध्ये  10 ते 15 जण कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 outbreak on Mount Everest) असल्याचं 'झी मी़डिया'च्या सूत्रांचं म्हणणं आहे. झी मीडियाला एव्हरेस्ट बेस कॅम्पमधील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार आणखी काही जणांना कोरोनाची लक्षण (coronavirus symptoms) दिसत असून त्यांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान 10 ते 15 जण पॉझिटिव्ह असल्यानं  9 तारखेला आयोजित करण्यात आलेली एव्हरेस्ट चढाईची मोहीम रद्द करण्यात आल्याचं बेस कॅम्पच्या प्रमुख मिनिग्मा शेर्पांनी झी मीडियाची सहकारी वृत्तवाहिनी विऑनशी बोलताना सांगितले आहे. 


 दरम्यान नेपाळ (Nepal) सरकारमधील अधिकृत सूत्रांनी मात्र असं काही झालेलं नसल्याचं म्हटले आहे. नेपाळ सरकारनं एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्यासाठी बेस कॅम्पवर पोहचलेल्या सर्वांना कोरोनासंदर्भात काळजी घेण्याची सूचना केली आहेच. शिवाय अशा मोहिमा आयोजित कऱणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी गिर्यारोहकांसाठी बेस कॅम्पवरच सेल्फ आयसोलेशनची सोय करावी असे निर्देशही नेपाळ सरकारनं तेथील व्यावसायिकांना दिल्या आहेत.


यापूर्वी पर्यटन विभागाने सर्व ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांना कोरोनव्हायरसच्या प्रसाराविरूद्ध सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ट्रेकिंगमधून परत आल्यानंतर गिर्यारोहकांसाठी स्वत: ला वेगळ्या ठेवण्याची व्यवस्था करण्याची विनंती सरकारने ट्रॅव्हल एजन्सी आणि मोहीम संस्थांना केली होती. नेपाळमध्ये बुधवारी गेल्या 24 तासांत 8,659 नवीन कोरोनाव्हायरस आणि 58 मृत्यूची नोंद झाली.


त्याआधी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये संक्रमित सापडलेल्या नॉर्वेचा गिर्यारोहक अरलेड नेस याला हेलिकॉप्टरने काठमांडूला नेण्यात आले होते. तेथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेस यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 15 एप्रिलला ते पॉझिटिव्ह आले. गुरुवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली, ती नेगेटिव्ह आली. ऑस्ट्रेलियाच्या एका गिर्यारोहकाने असा इशारा दिला की, हा विषाणू एव्हरेस्टवर चढाई करणार्‍या शेकडो गिर्यारोहकांपर्यंत पसरू शकतो. त्यामुळे बेस कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्याची गरज आहे.