धोनीच्या `त्या` ग्लोव्हजवरून पाकिस्तान मंत्र्यानं भारतीयांना डिवचलं
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचमध्ये विकेटकिपिंगच्या या हॅन्ड ग्लोव्हजवर कॅमेऱ्यानं फोकस केल्यानंतर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं
मुंबई : वर्ल्डकप २०१९ दरम्यान भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचा एक वेगळाच अंदाज मैदानात दिसला. भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅचदरम्यान त्याच्या ग्लोव्हजवर अर्धसैनिक दलाचं - 'बलिदान ब्रिगेड'चं मानचिन्ह दिसलं. यावर झालेल्या वादानंतर आयसीसीनं त्यावर आक्षेप घेत 'धोनीने त्याच्या ग्लोव्हजवरून हे मानचिन्ह काढून टाकावं', असे आदेश दिले आहेत. परंतु, या दरम्यान धोनीच्या या कृत्याच्या प्रतिक्रिया पाकिस्तानातूनही दिसून आल्या. पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमधले एक मंत्र्यानंही याबद्दल ट्विटरवरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
धोनीच्या ग्लोव्हजवर अर्धसैनिक दलाचं मानचिन्ह देऊन आदर व्यक्त केल्यानंतर अर्थातच भारतीय चाहत्यांकडून त्याला कौतुकाच्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. परंतु, आयसीसीनं मात्र हे नियमांच्या विरुद्ध असल्याचं सांगितल्यानंतर वाद सुरू झाला.
पाकिस्तान सरकारमधील विज्ञानमंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी ट्विटरवर 'धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेलाय, महाभारत नाही. भारतीय मीडियात हा काय वाद सुरू आहे. मीडियाचा एक वर्ग युद्धासाठी एवढा उतावळा आहे की त्यांना सीरिया, अफगाणिस्तान किंवा रावंडाला धाडायला हवं' अशी प्रतिक्रिया नोंदवली.
हे ग्लोव्हज महेंद्र सिंह धोन यानं पहिल्यांदाच वापरले असं नाही... परंतु, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचमध्ये विकेटकिपिंगच्या या हॅन्ड ग्लोव्हजवर कॅमेऱ्यानं फोकस केल्यानंतर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं.
उल्लेखनीय म्हणजे, धोनीच्या हॅन्डग्लोव्हजवर दिसलेलं बलिदान ब्रिगेडचं मानचिन्ह धारण करण्याचा अधिकार केवळ पॅरामिलिटरी कमांडोलाच आहे. धोनीचा समावेश प्रादेशिक सेनेत करण्यात आलाय. तसंच २०११ मध्ये धोनीला भारतीय सेनेच्या पॅरास्पेशल फोर्समध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पदवी प्रदान करण्यात आलीय. धोनीनं २०१५ मध्ये पॅरा ब्रिगेडची ट्रेनिंगही घेतलीय. प्रशिक्षणादरम्यान धोनीनं पाच पॅराशूट उड्याही घेतल्या होत्या. त्याच्या बॅगचा रंगही सेनेच्या कॅमफ्लेजप्रमाणेच आहे.