महिलेच्या सूपमध्ये मेलेला उंदीर, हॉटेलला १९ कोटींचा फटका
एका गर्भवती महिलेला सूपमध्ये मेलेला उंदीर दिल्याने, एका प्रसिद्ध चीनी रेस्टॉरंटने शेअर बाजारात १९ कोटी गमावले आहेत.
बीजिंग : एका गर्भवती महिलेला सूपमध्ये मेलेला उंदीर दिल्याने, एका प्रसिद्ध चीनी रेस्टॉरंटने शेअर बाजारात १९ कोटी गमावले आहेत. चॉपस्टिकने मेलेला उंदीर सूपमधून बाहेर काढण्याचा फोटो ऑनलाईन व्हायरल झाल्यानंतर, शिआबू शिआबू नावाच्या हॉटपॉट रेस्टोरंटचे शेअर्स, संपूर्ण वर्षभरात सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले.
चीनमधील शेनडूंग प्रांतच्या या आऊटलेटला सध्या बंद करण्यात आलं आहे. कथित प्रकरणानुसार रेस्टॉरंटने महिलेला ५ हजार युआन भरपाई म्हणून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
स्थानिक समाचार एजन्सी कंकागन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने भरपाईचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. जोपर्यंत पत्नीचं संपूर्ण बॉडीचेकअप होत नाही, तोपर्यंत असा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचं पतीने म्हटलंय.
ही गर्भवती महिला ६ सप्टेंबर रोजी आपल्या परिवारासोबत या रेस्टॉरंटमध्ये खायला गेली होते, जेथे तिच्या खाण्यात हा मेलेला उंदीर सापडला होता.
जेव्हा या महिलेल्या पतीने सांगितलं की, त्याला आपल्या पत्नीच्या गर्भातील बाळाविषयी चिंता वाटतेय, तेव्हा एका रेस्टॉरंट स्टाफने सल्ला दिला की, गर्भपात करून टाका, यासाठी आम्ही तुम्हाला २० हजार युआने देऊ.
सूपमध्ये उकळल्या गेलेल्या उंदीर चीनी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. वीबो या सोशल वेबसाईटवर हा फोटो व्हायरल होतोय, लोकांचा संताप होतोय.
एका युझरने म्हटलं आहे, मला उल्टी झाल्यासारखं वाटतंय, मी आता बाहेर काहीच खाऊ शकत नाही.
११ सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स मागील ऑक्टोबरनंतर सर्वात खाली आले आहेत.