नवी दिल्ली : इथिओपियन एअरलाईनच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर काल रात्री उशिरा भारत सरकारच्या नागरी हवाई प्रधिकरणानं बोईंग ७३७ मॅक्स ८ जातीच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातलीय. भारतात खासगी विमान वाहतूक करणाऱ्या 'जेट एअरवेज' आणि 'स्पाईस जेट' या दोन कंपन्यांकडे या जातीची विमानं आहेत. 'स्पाईस जेट' अशी १२ विमान आहेत. तर जेट एअरवेज कडे 'बोईंग ७३७ मॅक्स ८'चे पाच विमान आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोईंग मॅक्स ७३७ मॅक्स ८ जातीच्या विमानांवर गेल्या ४८ तासांत सगळ्याच लहान मोठ्या देशांनी बंदी घातलीय. गेल्या दोन महिन्यांत याच जातीच्या विमानांचे जगभरात पाच अपघात झाले आहेत. भारतात ही बंदी सर्वात उशिरा घालण्यात आलीय. इथिओपियातील विमान अपघात बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचा संशय व्यक्त होतोय. रविवारी झालेल्या या विमान दुर्घटनेत १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इथोपियाच्या अदीस अबाबाजवळ या विमानाला अपघात झाला. यामध्ये चार भारतीयांचाही समावेश होता. गेल्या पाच महिन्यांत 'बोईंग ७३७ मॅक्स ८' विमानाला दुसऱ्यांदा अपघात झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लायन एअरलाईनच्या याच जातीच्या विमानाला इंडोनेशियामध्ये अपघात झाला होता. या अपघातात १८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.  


त्यानंतर सर्वच देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातलीय. आता जोवर विमानांच्या तांत्रिक सुरक्षिततेची पूर्ण हमी मिळणार नाही तोवर बंदी कायम राहील, असं 'डीजीसीए'नं म्हटंलय. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.   


केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंनी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावलीय. बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांवर बंदी घातल्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आलीय. 'डीजीसीए'नं बंदी घातल्यामुळे याचा थेट परिणाम भाडेवाढीवर होऊ शकतो.