मुंबई: दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 8 मे ला मदर्स डे (Mothers Day) साजरा केला जाणार आहे. हा दिवस आईच्या प्रेम, ममता याला समर्पित केला जातो. आई आपल्या मुलांच्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. आईच्या आशीर्वादाने आपण जीवनातील अनेक समस्यांना खंबीरपणे तोंड देऊ शकतो. परिस्थिती कशीही असो, ती कशी हाताळायची हे आईला माहित असतं. मदर्स डे कधीपासून सुरु झाला आणि का साजरा केला जातो? हे आपण जाणून घेऊयात. 


कशी झाली मदर्स डे ची सुरुवात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मदर्स डे या दिवसाची सुरुवात अमेरिकेतील एना जार्विस (Anna Jarvis) या महिलेने सुरु केली. जार्विस यांचा आपल्या आईवर खूप जीव होता. आई तिच्यासाठी प्रेरणा होती. आईच्या मृत्यूनंतर एनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपलं आयुष्य आईच्या नावावर अर्पण करण्याचा संकल्प एनाने केला. आईच्या सन्मानासाठी एनाने मदर्स डे ची सुरुवात केली. या दिवसाला युरोपमध्ये मदरिंग संडे असं म्हटले जाते.


मदर्स डे रविवारीच का साजरा केला जातो?


एना जार्विस यांनी मदर्स डे या दिवसाची पायाभरणी केली असेल, परंतु मातृदिनाची औपचारिक सुरुवात 9 मे 1914 रोजी झाली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी  मदर्स डे साजरा करण्यास मान्यता दिली होती. अमेरिकन संसदेत कायदा केला आणि मे महिन्याच्या दुसऱ्या रविवार हा मदर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.



भारतातील मदर्स डे चा इतिहास 


भारतात मदर्स डे ची सुरुवात फार पूर्वी किंवा प्रचीन काळापासून झाली असं नाही. काही दशकांपूर्वीपासून हा दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आईसोबत वेळ घालवतात. अनेकजण या दिवशी आईला अनेक प्रकारच्या भेटवस्तूही देतात. आईसोबत फिरण्यासाठी जातात, जेवणाचा प्लॅन करतात. अनेकजण मदर्स डे ला घरी पार्टीचे आयोजनही करतात. आणि आपल्या आईला शुभेच्छाही देतात.