इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही `घर घर की कहानी`
राजकुमाराने घेतला राजवाडा सोडण्याचा निर्णय
लंडन : इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही घर घर की कहानी सुरू झाली आहे. प्रिन्स हॅरी आणि सूनबाई मेगन मर्केल लवकरच राजवाडा सोडून नव्या घरात राहायला जाणार आहेत. थोरल्या सूनबाई केट मिडल्टन आणि धाकट्या सूनबाई मेगन मर्केल यांचे आपापसात खटके उडू लागल्याची चर्चा आहे. त्यामुळंच प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल राजवाडा सोडून, फ्रॉगमोर हाऊस या १० खोल्यांच्या नव्या घरात राहायला जाणार असल्याचं समजतं आहे.
प्रिन्स हॅरी आणि सिने अभिनेत्री मेगन मर्केल यांचा मे २०१८ मध्ये शाही विवाह सोहळा पार पडला होता. त्यांना लवकरच बाळ देखील होणार आहे. मेगननं बाळाला जन्म दिल्यानंतर रॉयल बेबीसह हे कुटुंब नव्या घरात राहायला जाणार आहे. ते दोघे सध्या केंजिंग्टन पॅलेस म्हणजेच मुख्य राजवाड्यातील दोन खोल्यामध्ये राहातात.
सुरुवातीला याच राजवाड्यातील एका अपार्टमेंटमध्ये राहाण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता मात्र केट आणि मेगन प्रमाणे दोन्ही भावांमधीलही विसंवाद वाढल्याने मुख्य राजवाडाच सोडण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. राणी एलिझाबेथनं फ्रॉगमोर हाऊस लग्नाची भेट म्हणून दोघांना भेट दिला आहे.