डॉक्टरने चक्क महिलेचा डोळाच शिवला, कॉस्मेटिक सर्जरी करताना भयंकर चूक; डोकं हलवल्याशिवाय डोळा हलेना
2021 मध्ये चीनच्या शांदोंगमधील वेफांग येथील महिला तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातील असमानता दुरुस्त करण्यासाठी Weifang Kuiwen Rendu Medical Beauty Clinic येथे पापण्यांची दुहेरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे परिणाम इतके वाईट झाले की ते आजतागायत भोगत आहेत.
कॉस्मेटिक सर्जरी करताना अनेकदा एखादी चूक होते, ज्याचा रुग्णाला कायमस्वरुपी परिणाम भोगावा लागतो. थोडक्यात सर्जरी करताना ती पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. अनेकदा महिला आपले ओठ, नाक किंवा शरिरावरील एखादा भाग नीट करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय स्विकारतात. पण सर्जरी चुकीची झाल्यास काय होऊ शकतं हे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना पाहिल्यावर लक्षात येतं.
2021 मध्ये चीनच्या शांदोंगमधील वेफांग येथील महिला तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातील असमानता दुरुस्त करण्यासाठी Weifang Kuiwen Rendu Medical Beauty Clinic येथे पापण्यांची दुहेरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सर्जरी सुरु असताना आपल्याला असह्य वाटत होतं असा महिलेचा दावा आहे. सर्जरी केल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की, तिच्या डाव्या डोळ्याची बाहुली आणि त्या डोळ्याचा कोपरा एकत्र शिवण्यात आला आहे.
ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरने आधी सांगितलं की सर्व काही ठीक आहे. मात्र नंतर झांगला सर्व अस्पष्ट दिसू लागलं. यानंतर डोळ्यांची हालचालही कमी होऊ लागली. उपचार केल्यानंतर दोन वर्षांनी आजही ती शारिरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करत आहे.
'डोळ्याची बाहुली आणि कोपऱ्यात कनेक्शन'
झांगने अलीकडे सोहू व्हिडिओला सांगितले की, "नोव्हेंबर 2021 मध्ये, माझ्या डोळ्यांच्या बाहेरील कोपरे असमान असल्यामुळे माझ्या पापणीची दुहेरी शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी सांगितले की ते काहीतरी ऍडजस्टमेंट करतील. पण तो टाके घालत असताना मला माझ्या बाहुलीत अस्वस्थता जाणवली. टाके काढल्यानंतर, मला बाहुली आणि माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यात एक धाग्यासारखं कनेक्शन दिसलं".
हॉस्पिटलचे संचालक, सर्जन वांग यांनी मला काही गंभीर नाही अशी खात्री दिली आणि त्यांना वेगळे करण्यासाठी दुसरं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, दुसरे ऑपरेशन अयशस्वी झाले. त्याचा परिणाम असा झाला की माझा डावा डोळा सुजला. प्रक्रियेनंतर एका आठवड्यानंतर, बाहुली आणि डोळ्याचा कोपरा पुन्हा एकदा एकत्र जोडला गेला.
पुढे तिने सांगितलं की, 'तेव्हापासून डाव्या डोळ्यातील दृष्टी अस्पष्ट झाली आहे आणि मी फक्त माझे डोके हलवून डोळे बाजूला वळवू शकत आहे.' झांगला आता शांघायमधील रुग्णालयात सुधारात्मक शस्त्रक्रिया करायची आहे, पण तिच्याकडे पैसे नाहीत. या परिस्थितीमुळे ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे.
झांगचा दावा आहे की तिने शस्त्रक्रियेसाठी ब्युटी क्लिनिकला 30,000 युआन (अंदाजे 3.52 लाख रुपये) दिले. चुकीची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिने पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु, शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी संपूर्ण पैसे परत करण्यास नकार दिला. त्याऐवजी, फक्त 1.17 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आणि आश्वासन देण्यात आले की समस्या किरकोळ आहे आणि ती दुसऱ्या शस्त्रक्रियेने बरी होऊ शकते. डॉक्टरांनी अद्याप हे पैसेही दिलेले नाहीत, असा महिलेचा दावा आहे.