नवी दिल्ली : डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. दोन्ही देशांचे  सैनिक एकमेकांसमोर होते. कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते. दरम्यान, चीन सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे तणावात अधिक भर पडली. आज दोन्ही देशात सहमतीने सैन्य मागे घेण्याचे मान्य करण्यात आले असून यावादावर आता पडदा टाकण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि चीन दरम्यान गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून चिघळत असलेला डोकलामचा वाद मिटण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडले आहे. सीमेवरचे लष्कर मागे घेण्यावर दोन्ही देशांचं एकमत झाले आहे. 


भारत पहिल्यापासूनच प्रश्न चर्चेने सोडवण्याच्या बाजूने  होता. चीनकडून मात्र वारंवार युद्धाच्या धमकी देण्यात येत होती. अखेर भारतीय परराष्ट्र नीतीमुळे अखेर चीनशी चर्चा करून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसात दोन्ही देश आपापले सैनिक मागे घेतील. 



येत्या तीन तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनमध्ये जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर डोकलामच्या तणावाचं सावट होते. दौऱ्याच्या अगदी आठवडाभर आधीच परराष्ट्र नीतीला मिळालेल्या या यशामुळे हा दौराही सुकर झाला आहे.