मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत २१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग १९६ देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरातले जवळपास ५ लाख लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत. कोरोनावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसच्या संकटात चीनची प्रमाणापेक्षा जास्त बाजू घेतल्याचा आरोप ट्रम्प यायंनी केला आहे. जगातले अनेक लोक WHOच्या भूमिकेमुळे नाराज आहेत. जे झालं ते चुकीचं झाल्याचं अनेकांना वाटत आहे, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प यांनी दिलेलं हे उत्तर WHOने चीनचं कौतुक केलेल्या प्रश्नावर दिलं. WHOचे डायरेक्टर टेडरोस अधनोम यांनी चीनचं कौतुक केल्यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे.


नोव्हेंबर महिन्यात चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. वुहानच्या रुग्णालयातील डॉक्टर ली वेनलियांग यांनी तेव्हाच प्रशासनाला या व्हायरसच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. पण डॉक्टर ली वेनलियांग यांना प्रशासनाकडून धमकवण्यात आलं एवढच नाही तर त्यांना पोलिसांनी अटकही केली.


मार्च महिन्यामध्ये ली वेनलियांग यांचा मृत्यूही झाला. वेनलियांग यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा दावा चीनने केला. पण त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे केले गेले.


जानेवारी महिन्यात वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण जलद गतीने वाढायला लागले. तेव्हाही चीनने आरोग्य आणीबाणी लावली नाही. कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता अनेक देशांनी वुहानसाठीची विमानसेवा रद्द केली. यानंतरही चीनने कोणतीच पावलं उचलली नाहीत, अखेर २३ जानेवारीला चीनने वुहानला लॉकडाऊन केलं. तोपर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणात आलेली ५ लाख लोकं वुहानमधून जगाच्या वेगवेगळ्या देशात गेले होते.


कोरोनाला रोखण्यात WHOअपयशी


कोरोना व्हायरसचा प्रसार चीनमध्ये वाढत असतानाही WHOने कोणतीच पावलं उचलली नाहीत. फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही WHOने कोरोनाला  महामारी घोषित केलं नाही. मार्च महिना उजाडल्यानंतर WHOने कोरोन जागतिक महामारी असल्याचं मान्य केलं. कोरोना चीनमध्ये आणि संपूर्ण जगात पसरत असताना WHOने चीनवर कोणतीच कारवाई केली नाही. WHOने वेळेत चीनवर कारवाई केली असती आणि कोरोनाला महामारी घोषित केलं असतं, तर जगात या रोगाचा प्रसार झाला नसता.


म्हणून चीनवर कारवाई नाही?


चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरस जगभरात पसरला, तरीदेखील आंतरराष्ट्रीय संस्थांनी चीनवर कारवाई केली नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद असल्यामुळे जगातल्या कोणत्याच संस्थेने चीनविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत दाखवली नसल्याचा आरोप होत आहे.