२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे. व्हाईट हाऊसमध्ये यंदा ईद आणि इफ्तार पार्टी झाली नाही. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमध्ये ईद साजरी केली जायची आणि इफ्तार पार्टीही व्हायची.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रक काढून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय ही परंपरा मोडेल आणि रमजानचा स्वागत समारंभ होणार नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी मे महिन्यातच स्पष्ट केलं होतं.
व्हाईट हाऊसमध्ये १८०५ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी ईद साजरी केली होती. यानंतर १९९६ पासून बिल क्लिंटन यांनी पुन्हा ईद साजरी करायला सुरुवात केली. यानंतर बुश आणि ओबामांच्या कार्यकाळातही ही परंपरा कायम ठेवण्यात आली होती.