वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यादेखील या दौऱ्यात उपस्थित असतील. भारतीय नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही लाखो लोकांसोबत असू. माझं आणि मोदींचं चांगलं पटतं. मोदी माझे चांगले मित्र आहेत. हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल, असं मोदींनी मला सांगितल्याचं ट्रम्प भारताकडे निघण्याआधी म्हणाले.





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील कार्यक्रम


डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया अमेरिकन शिष्टमंडळासोबत गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर सोमवारी दुपारपर्यंत पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत करतील. अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर ट्रम्प साबरमती आश्रमाला भेट देतील.


साबरमती आश्रमाच्या भेटीनंतर मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो होणार आहे. या रोड शोनंतर मोटेरा स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमानंतर ट्रम्प आग्र्याला निघणार आहेत. संध्याकाळी ट्रम्प दाम्पत्य ताज महालमध्ये जातील. ताज महालाला भेट दिल्यानंतर ट्रम्प दिल्लीसाठी रवाना होतील.


मंगळवारी सकाळी राष्ट्रपती भवनामध्ये ट्रम्प यांचं औपचारिक स्वागत करण्यात येईल. राष्ट्रपती भवनातल्या कार्यक्रमानंतर ट्रम्प महात्मा गांधींच्या समाधी स्थळाला भेट देतील. महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांची हैदराबाद हाऊसमध्ये बैठक होईल. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात येईल.