नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमधील घडामोडींवर अमेरिकेचे लक्ष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत. परिस्थिती अत्यंत कठीण आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं की, 'ही एक अतिशय कठीण परिस्थिती आहे. आम्ही भारत आणि चीन या दोघांशी बोलत आहोत. त्यांच्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. काय करता येईल ते पाहू. आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करु.'



याआधी ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी भारत-चीन सीमा वादावर मध्यस्थी करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. ट्रम्प यांनी म्हटले होते की भारत आणि चीनमधील सीमा विवादांच्या मुद्यावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. पण त्यांची ही मध्यस्थती दोन्ही देशांनी फेटाळून लावली.


भारत आणि चीनमध्ये सीमेवर वाद सुरू आहे. अमेरिका सतत या घटनेवर लक्ष ठेवून आहे. नुकतीच व्हाईट हाऊसने या विषयावर एक निवेदनही जारी केले होते. ते म्हणाले होते की, आमची यावर नजर आहे आणि लवकरच या प्रकरणाचे निराकरण व्हावे अशी आमची इच्छा आहे.


या वेळी अमेरिका आणि चीन यांच्यात कोरोना विषाणू, व्यापार आणि एक प्रकारचे शीत युद्ध आहे. जुन्या काळापासून अमेरिका हा भारताचा मित्र आहे. अशा या तणावपूर्ण वातावरणात सतत अमेरिकेकडून भारताच्या बाजूने वक्तव्य देखील होत आहेत.