वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिका निषेध करत आहे आणि स्पेनची सर्वोतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. खंबीर आणि भक्कम व्हा. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो." न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्या ट्वीटनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी देखील स्पेनबद्दल समान भावना व्यक्त केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिलरसन म्हणाले की, "आम्ही देखील अशाप्रकारच्या हल्ल्यांना सामोरे गेलो आहोत. हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. अशा हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे." स्पेन मधील बार्सिलोना शहरातील सिटी सेंटरमध्ये एका व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले. 


स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार यात १३ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५० लोक जखमी झाले. युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर यांनी सांगितले की, "आपले कुटुंबिय आणि मित्रपरिवारासोबत वेळ घालवत असलेल्या लोकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला आहे. अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले सहन केले जाणार नाहीत."