मुंबई : अमेरिका चीनच्या विरुद्ध मैदानात उतरलं आहे. हॉस्टनमधलं चीनचं वाणिज्य दूतावास बंद केल्याचा आदेश दिल्यानंतर, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक इशारा दिला आहे. भविष्यामध्येही असे निर्णय घेतले जातील, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने बुधवारी चीनी वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन नागरिकांची बौद्धिक संपदा आणि वैयक्तिक सूचनांचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच अमेरिकेच्या निर्णयामुळे तणाव वाढेल, अशी धमकीही चीनने दिली आहे. 


चीनने दिलेल्या या धमकीचा अमेरिकेवर कोणताच परिणाम झाला नाही, उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी भविष्यात आणखी काही चीनी दूतावास बंद करू, असं सूचक विधान केलं. 



'हॉस्टनमधलं दूतावास बंद केल्यानंतर तिकडे काही कागदपत्र जाळण्याचे प्रकार घडले. यामुळे संशय निर्माण होतो. आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. गरज पडली तर चीनचे दुसरे दूतावासही बंद केले जाऊ शकतात,' असं ट्रम्प म्हणाले.


हॉस्टनमधलं दूतावास बंद करण्याचा आदेश देण्यात आल्यानंतर तिकडे कागदपत्र जाळली जात असल्याचं काहींनी बघितलं. यामुळे चीनी दूतावास हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेचा संशय बळावला आहे.


'अमेरिकेची बौद्धिक संपदा आणि वैयक्तिक माहितीची रक्षा करण्याच्या उद्देशाने चीनचं हॉस्टनमधलं दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनकडून अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आणि आमच्या लोकांना धमकावणं सहन केलं जाणार नाही. चीनच्या अनुचित व्यापार व्यवहार, अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या चोरणं तसंच इतर आक्रमक व्यवहारांनाही याआधी सहन केलं गेलं नव्हतं,' असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले.