किम जोंगना शोधण्यासाठी अमेरिकेने पाठवले ५ `जेम्स बॉण्ड`
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सध्या कुठे आहेत?
मुंबई : उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सध्या कुठे आहेत? किम जोंग आजारी आहेत का त्यांचा मृत्यू झाला आहे? कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे किम जोंग लपून बसले आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या जागतिक पातळीवर विचारले जात आहेत. त्यातच अमेरिकेने किम जोंगना शोधण्यासाठी अमेरिकेने आपली ५ हेरगिरी करणारी विमानं कामाला लावली आहेत. अमेरिकेने त्यांची ५ विमानं उत्तर कोरिया आणि किम जोंगवर नजर ठेवण्यासाठी पाठवली आहेत. किमला शोधण्यासाठी गुप्तहेर पाठवल्याची ही बातमी डेली मेल आणि द सन या वृत्तपत्रांनी दिली आहेत.
दुसरीकडे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनीही अमेरिकेने किम जोंग यांचा पत्ता शोधण्यासाठी ५ विमानं पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेने RC-12X गार्ड्रिल विमान सिग्नल इंटेलिजन्ससाठी पाठवलं आहे. तर Air Force E-8C हे विमान याआधी इराक आणि सीरियामध्ये वापरण्यात आलं होतं. EO-5C हे विमान फोटो काढण्यासाठी सिग्नल पकडण्यासाठी आणि जमिनीवर रडार सेन्सरच्या माध्यमातून परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय अमेरिकेने आणखी दोन हायटेक विमानंही सोबत पाठवली आहेत.
अमेरिका दक्षिण कोरियामधल्या त्यांच्या तळांवरून उत्तर कोरियावर नजर ठेवणार आहेत. उत्तर कोरियातल्या सगळ्या हालचालींची माहिती व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचवली जाणार आहे. दक्षिण कोरियानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काहीच दिवसांपूर्वी या योजनेचे संकेत दिले होते.