VIDEO:अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ज्यो बिडेन यांची उडवली खिल्ली, व्हीडिओ व्हायरल
डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ज्यो बिडेन यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेला एक व्हीडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हीडिओच्या माध्यमातून ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांची खिल्ली उडविली आहे. अमेरिकेत २०२० साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद रंगला आहे. या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ज्यो बिडेन यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच ज्यो बिडेन यांच्या चारित्र्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर ज्यो बिडेन यांनी बुधवारी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून आपण भविष्यात महिलांशी अधिक काळजीपूर्वक वागू, अशी ग्वाही दिली.
काही दिवसांपूर्वी नेवाडातील सभागृहाच्या सदस्य ल्युसी फ्लोरेस यांनी सीएनएन वृत्तसंस्थेला मुलाखत देताना २०१४ सालचा प्रसंग सांगितला होता. त्यावेळी ज्यो बिडने माझ्या पाठीमागून आले आणि त्यांनी माझ्या डोक्याच्या मागील भागाचे चुंबन घेतले होते. बिडेन यांची ही कृती आक्षेपार्ह आणि गोंधळात टाकणारी होती, असे ल्युसी फ्लोरेन्स यांनी म्हटले होते. यानंतर आणखी सात महिलांनी ज्यो बिडेन यांनी आपल्याशी अशाप्रकारे लगट केल्याचे जाहीरपणे सांगितले. हाच धागा पकडत ट्रम्प यांनी बिडेन यांची खिल्ली उडवणारा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
तत्पूर्वी बिडेन यांनी आपल्या व्हीडिओद्वारे महिलांविषयीचे आपले वर्तन सुधारण्याचे आश्वासन दिले. राजकारणाकडे मी कधीही रुक्ष आणि प्रतिगामी दृष्टीकोनातून पाहिलेले नाही. मी नेहमी लोकांशी अधिकाअधिक संपर्क ठेवण्याला प्राधान्य दिले. मग ते हस्तांदोलन, खांद्यावर हात टाकणे, आलिंगन देणे, प्रोत्साहन देणे किंवा अलीकडे आलेली सेल्फी घेण्याची पद्धत असो, या सगळ्यामुळे एकमेकांशी संपर्क वाढतो, असे मला वाटायचे. मात्र, हल्ली सामाजिक आचरणाच्या पद्धती बदलायला लागल्या आहेत. व्यक्तिगत स्वातंत्र्य जपण्यासाठी आचरणावर बंधने आली आहेत. ही गोष्ट आता माझ्या ध्यानात आल्याचे ज्यो बिडेन यांनी व्हीडिओत म्हटले होते.