नेदरलॅंड :  आलिशान महाल, दिमतीला नोकर, नेहमी पंचपक्वानाचे ताट, पिढ्यान पिढ्याची श्रीमंती इतकं वैभव असणारी व्यक्ती नोकरी करेल असे तुम्हांला वाटतं का ? सहाजिकच अनेकांना ' नाही'  असंच वाटत असेल... पण डच राजा  विल्येम अलेक्झांडर याला अपवाद आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे पायाशी लोळण घालत असलेलं वैभव सांभाळत याने तब्बल २० वर्ष विमान चालवण्याचा छंद जोपासला. राजा अलेक्झांडर गेल्या वीस वर्षांपासून केएलएम रॉयल एअरलाइन्समध्ये सहाय्यक वैमानिक म्हणून काम करत असल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. 


सामान्य वैमानिकाप्रमाणे ते गणवेशात विमानतळावर यायचे त्यामुळे त्यांना फारसं प्रवाशांनी ओळखले नाही. क्वचित लोकांना राजा विमान चालवत असल्याची माहिती होती. विमान चालवणं हा विल्येम यांचा छंद आहे,तो जोपासण्यासाठी त्यांनी वैमानिकाची नोकरी स्वीकारली. आपल्या जबाबदारीतून वेळ काढत नियमित महिन्यातून दोन वेळा ते सहायक वैमानिक म्हणून काम करायचे.


विमान चालवताना राजा म्हणून असलेली जबाबदारी, वैयक्तिक आयुष्यातील आड अडचणी यापासून खूप दूर आणि मोकळं वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. सध्या राजा अलेक्झांडर बोइंग ७३७ विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत.