Haiti Earthquake | हैतीत महाशक्तीशाली भूकंप; खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान
हैतीमध्ये शनिवारी रात्री शक्तीशाली भूकंप आल्याने मोठ्या प्रमाणावर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पोर्ट-औ-प्रिंस : हैतीमध्ये शनिवारी रात्री शक्तीशाली भूकंप आल्याने मोठ्या प्रमाणावर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या भूकंपात कमीत कमी 304 लोकांचा मृत्यू झाले असून 1800 लोकं जखमी झाले आहेत. भूकंपाची भीषणता इतकी होती की अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हैतीचे पंतप्रधान एरिअल हेनरी यांनी म्हटले की, लोकांना तातडीची मदत मिळण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. तसेच जखमींवर उपचारही सुरू आहेत.
अमेरिकी जिओलॉजिकल सर्वेच्यामते भूकंपाचा केंद्रबिंदू हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिंस पासून 125 किलोमीटर पश्चिमेला होता. हैतीच्या सिविल प्रोटेक्शन एजंन्सीने ट्विटरवर माहिती दिली की, या घटनेत आतापर्यंत 304 लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्यातील जवान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
हैतीच्या पंतप्रधानांनी देशात एका महिन्याची आणीबाणी जारी केली आहे. त्यांनी म्हटले की, नुकसानीचे आता योग्य अंदाज लावता येणार नाही. त्यांनी म्हटले की काही गावच्या गावं नष्ट झाली आहेत.
घरे नष्ट झालेल्या लोकांना उपचार, अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची सोय सरकार तातडीने करणार आहे. हैतीत 2010 साली विनाशकारी भूकंप आला होता. या भूकंपात 3 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. त्यातून देश नागरीकांच्या एकजूटीने सावरला होता.
दरम्यान हैतीत झालेल्या भूकंपामुळे हैतीला इतर देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.