मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सामग्रीचा तुटवडा, होत असलेलं आर्थिक नुकसान अशा अनेक गोष्टींना सामोरे जात प्रत्येक देश हे युद्ध जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर काही देशांमध्ये कोरोनामुळे बळी गेलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे या राष्ट्रातील सरकारने कोरोना रुग्णांचे मृतदेह  तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या थंड कंटेनरमध्ये ठेवले आहेत. सर्वच राष्ट्रांमधील परिस्थिती पाहता हे सावट कधी दूर होईल या प्रतिक्षेत जगातील सर्वच नागरिक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी इक्वाडोर (Ecuador)या राष्ट्राला जागा अपूरी पडत आहे. धक्कादायक म्हणजे या देशातील रुग्णालयांच्या शवगृहातही कोरोनाने बळी गेलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांचे मृतदेह तात्पूरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या थंड कंटेनरमध्ये ठेवले आहेत. हे थंड कंटेनर ४० फूट लांब आहेत.


 दरम्यान जोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी  जागा उपल्ब्ध होत नाही तोपर्यंत हे मृतदेह रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या देशात घरांच्या बाहेर आणि रस्त्यांवर देखील मृतदेह पडले आहेत. त्यामुळे या व्हायरसमुळे ज्या व्यक्तींनी आपले प्राण गमावले आहेत. त्याच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आमची असल्याचं येथील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान कोरोना ग्रस्तांची एकुण आकडेवारी पाहता, आताच्या घडीला संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची संख्या २३ लाख ४४ हजार ९६९ इतकी आहे. तर तब्बल १ लाख ६१ हजार १९१ रुग्णांचा या धोकोदायक विषाणूने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ६ लाख ४ हजार ४२२ लोकांनी या आजारावर मात केली आहे.