ट्विटरचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांची पत्नी ग्रिम्सने त्यांच्याविरोधात कायदेशीवर कारवाई केली आहे. तिन्ही मुलांसह पालकत्व सिद्द करण्यासाठी ग्रिम्सने एलॉन मस्क यांना कोर्टात खेचलं आहे. गायिका असणाऱ्या ग्रिम्सने 29 सप्टेंबर रोजी पालकत्व सिद्ध करण्याच्या हेतूने कॅलिफोर्निया कोर्टात याचिका दाखल केली आहे. लग्न झालेले नसताना कायदेशीर पालकांना न्यायालयाने मान्यता द्यावी, असा या याचिकेचा उद्देश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रिम्सने दाखल केलेली याचिका समोर आल्यानंतर या वृत्ताचा उलगडा झाला. दरम्यान टेस्लाचे सह-संस्थापक असणारे एलॉन मस्क यांनी अद्याप यावर उत्तर दिलेलं नाही. अद्याप तरी ग्रिम्सने मुलांचा ताबा मागितलेला नाही. 


35 वर्षीय ग्रिम्स आणि 52 वर्षीय एलॉन मस्क यांनी 2018 मध्ये डेटिंग सुरु केलं होतं. त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले होते. अखेर सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी नातं संपवलं होतं. 


कॅनेडियन गायिका आणि एलॉन मस्क यांना मे 2020 मध्ये पहिला मुलगा झाला. यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांनी मुलीचं स्वागत केलं. सप्टेंबरमध्ये, पत्रकार वॉल्टर आयझॅकसन यांच्या 'एलॉन मस्क' चरित्रातून उघड झालं की, स्पेसएक्सचे संस्थापक आणि ग्रिम्स यांना तिसरे अपत्य आहे. टेक्नो मेकॅनिकस असं त्याचं नाव आहे. पण त्याचा जन्म कधी झाला हे अस्पष्ट आहे.


ग्रिम्सने काही आठवड्यांपूर्वी एक्सवरुन एलॉन मस्क यांच्याकडे मुलाला पाहून देण्यासाठी अक्षरश: भीक मागितली होती. त्यानंतर काही आठवड्यातच ही याचिका करण्यात आली आहे. मला कधीच माझ्या मुलांना पाहण्याची संधी देण्यात आली नसल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. पण नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती. एलॉन मस्क यांचा आतापर्यंत तीनवेळा घटस्फोट झाला असून, 11 मुलं आहेत.