ऐकावं ते नवलंच... वाहत्या धबधब्याखाली पेटती ज्वाला!
वास्तविक पाहता हा चमत्कार वेगैरे काही नाही...
न्यूयॉर्क : निसर्ग जादुगारापेक्षा काही कमी नाहीत. जगात अशी अनेक आश्चर्य आहेत ज्यापुढं माणसाची मती गुंग होते. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क जवळच्या 'चेस्टनट रिट्स पार्क'मध्ये एक धबधबा आहे. इंटर्नल फ्लेम फॉल्स असं या धबधब्याचं नाव आहे. या धबधब्याखाली चक्क एक पेटती ज्वाळा आहे.
गेल्या अनेक दशकांपासून या धबधब्याखाली ही आग लागलेली आहे. धो धो पाणी कोसळत असतानाही ही ज्वाळा विझलेली नाही. हे झालं वसंत ऋतूतलं हिवाळ्यात जेव्हा इथं बर्फवृष्टी होते तेव्हा हा धबधबा गोठून जातो. गोठलेल्या धबधब्याखालीही आग पेटलेलीच असते.
वास्तविक पाहता हा चमत्कार वेगैरे काही नाही. धबधब्याच्या खाली जो खडक आहे त्या खडकाखालून मिथेन वायू बाहेर पडतो. कधीतरी हा मिथेन वायू आगीच्या संपर्कात येऊन इथं आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. तेव्हापासून धबधब्याच्या खाली असलेल्या खोबणीत ही आग पेटतेय.
चमत्काराला सगळेच नमस्कार करतात. पण भारतासारखी स्थिती अमेरिकेत नाही. भारतात आतापर्यंत तिथं भलंमोठं धार्मिक स्थळ उभं राहिलं असतं. पण ती अमेरिका आहे. अमेरिकन्स चमत्काराकडेही वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहतात. त्यामुळंच 'इंटर्नल फ्लेम फॉल्स'ला दैवीपण लाभलेलं नाही.