मुशर्रफ यांच्या निमित्तानं पाकच्या सुपर पॉवरफुल लष्कराला धक्का
उल्लेखनीय म्हणजे, माजी लष्करशहा सध्या संयुक्त अरब अमिरातल्या दुबईमध्ये आहेत
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झालीय. देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाकिस्तानात हे पहिल्यांदाच घडतंय, हे विशेष... परवेझ मुशर्रफ हे कारगिल हल्ल्याचे मास्टरमाइंड... मुंबईतल्या २६/११ हल्ल्याला कृतीशील पाठिंबा असलेले लष्करशहा... त्यांना अखेर देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. त्यांनी भारताचे जे अपराध केलेत त्यासाठी ही शिक्षा कमीच असली तरी त्यांना शासन झालंय ते पाकिस्तानसोबतच केलेल्या गद्दारीमुळे...
मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ असे तब्बल १० वर्ष पाकिस्तानवर अक्षरश: राज्य केलं. लोकशाहीनं निवडून आलेल्या सरकारविरुद्ध बंड करून सत्ताधीश झालेल्या मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानची राज्यघटनाच रद्द करून टाकली होती. पाकिस्तानमध्ये हा अपराध देशद्रोह मानला जातो आणि त्यासाठी देहदंडाची शिक्षा आहे.
पेशावर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद, सिंध हायकोर्टाचे न्यायाधीश नाझर अकबर आणि लाहोर हायकोर्टाचे न्यायाधीश शाहीद करीम यांच्या न्यायालयानं २ विरुद्ध १ मतांनी मुशर्रफ यांना ही शिक्षा ठोठावलीय. हा खटला २०१३ सालापासून प्रलंबित होता.
उल्लेखनीय म्हणजे, माजी लष्करशहा सध्या संयुक्त अरब अमिरातल्या दुबईमध्ये आहेत. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुखाचं बंड आणि त्यानं लोकशाही उलथवून सत्ता हिसकावून घेणं हे नवं नाही. मात्र, या कृतीबद्दल देशद्रोहाचा आरोप सिद्ध होऊन शिक्षा होण्याची पहिलीच घटना आहे. एका अर्थी पाकिस्तानच्या सुपर पॉवरफुल लष्कराला धक्का देणारी ही घटना आहे.