कोरोनाचे सावट : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, `फेडरल` ची व्याजदरात कपात
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत आहे.
न्यूयॉर्क : जगात कोरोना व्हायरसचा धसका घेतला गेला आहे. चीनमधून प्रसारित झालेला कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. लाखोंच्या घरात कोरोना लागण झालेले आढळून आले आहेत. तर जगभरात आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. कोरोनाचा परिणाम हा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेत झालेले विपरीत परिणाम रोखण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. व्याजकपात करून तो जवळपास शून्यावर आणला आहे.
फेडरल रिझर्व्हने गेल्या दोन आठवड्यांच्या आतच व्याजदरात दुसऱ्यांदा व्याजदारात मोठी कपात केली आहे. हे व्याजदर शून्य ते शून्य पूर्णांक २५ दशांश टक्क्यांवर आणला आहे. या आधी २००८ मध्ये जागतिक मंदीच्या काळात अमेरिकेतले व्याजदर घटवत ते कमी पातळीवर आले होते. आता पुन्हा अमेरिकेला आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोठे पाऊल उचलावे लागले आहे. त्यामुळे अमेरिकेत आर्थिक मंदीची मोठी झळ पोहोचल्याचे दिसून येत आहे. तसेच अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने विमान सेवा बंद केली आहे. कोणाला अमेरिकेत येऊ दिले जात नाही.
व्याज दरातल्या कपातीसोबतच बँकेने मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी करण्याचा आणि इतर बँकांना स्वस्त दरात कर्ज देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. यामुळे या बँकांनी देशातल्या उद्योग व्यवसायांना आणि नागरिकांना मदत करावी, असे आवाहनही फेडरल रिझर्व्हने केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हणत, या निर्णयांचे स्वागत केले आहे.