मला वर्ल्डकप जिंकून आल्यासारखे वाटतेय- इम्रान खान
आपल्याला पाकिस्तानला महान करायचे आहे. मात्र, ते भीक मागून साध्य होणार नाही.
इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बुधवारी रात्री अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतले. यावेळी इस्लामाबाद विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे कार्यकर्ते विमानतळाबाहेर मोठमोठ्याने ढोल बडवत होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, इम्रान खान यांचा अमेरिका दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यानंतर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, मला एखाद्या परदेश दौऱ्यावरून नव्हे तर विश्वचषक जिंकून आल्याचा भास होत आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी संघाने १९९२ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले होते. कालच्या स्वागत सोहळ्याने इम्रान खान यांच्या त्या आठवणी ताज्या झाल्या.
काल इम्रान खान विमानतळावरून बाहेर पडले तेव्हा पक्षाचे कार्यकर्ते ढोल वाजवून आणि नाचून आनंद साजरा करत होते. यावेळी इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, आपल्याला पाकिस्तानला महान करायचे आहे. मात्र, ते भीक मागून साध्य होणार नाही. मी कोणापुढेही झुकणार नाही आणि पाकिस्तानलाही झुकून देणार नाही. जे समाज स्वत:च्या ताकदीवर उभे राहिलेत त्यांनी कधी भीक मागितली नाही, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेहून पाकिस्तानला परतत असताना इम्रान खान काहीवेळ कतारमध्ये थांबले होते. याठिकाणी कतारचे पंतप्रधान अब्दुल्ला बिन नस्र बिन अल सानी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध बळकट करण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते.