मुंबई : जगाच्या पाठीवर क्रोएशिया देशाची तशी कोणत्याच क्षेत्रात बलाढ्य म्हणून गणना होत नाही. अगदी फुटबॉल क्षेत्रातही क्रोएशियाकडे ताकदवान संघ म्हणून पाहिलं गेलं नाही. मात्र, या विश्वचषकात त्यांनी आपली ताकद साऱ्या जगाला दाखवली आणि क्रोएशिया देशाबाबत साऱ्या जगात चर्चा सुरु झाली. क्रोएशिया देश मोठ्या मोठ्या संघर्षानंतर अस्तित्वात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रोएशिया... उण्या-पुऱ्या साडे तीन दशकांपूर्वी अस्तित्वात आलेला देश... १९९१ पर्यंत हा आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढा देणारा देश... संघर्ष पाचवीलाच पुजलेल्या या देशानं फुटबॉल विश्वचषकात बलाढ्य इंग्लंडला पराभूत करण्याची किमया केलीय. मध्य आणि दक्षिण-पूर्व युरोपात मधोमध वसलेल्या या देशाची लोकसंख्या आहे केवळ ४० लाख... 


जवळपास २७ - २८ वर्षांपूर्वी हा देश जवळपास उद्धस्त होण्याच्या मार्गावर होता. युगोस्लावियानं केलेल्या हल्ल्यात क्रोएशियातील लाखो लोक मारले गेले तर कित्येक बेघर झाले. १९९१ च्या अखेरीस क्रोएशियाकडे केवळ एक तृतीयांश जमीन शिल्लक होती.  क्रोएशियासमोर पुन्हा स्वत:च्या पायांवर उभं राहण्याचं आव्हान होतं. २००० नंतर क्रोएशियानं लोकशाही आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्याकडे लक्ष वळवलं. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक व्यवस्था सुधारण्याचं मोठं आव्हान या देशासमोर होतं. 


मात्र या साऱ्यातून या देशानं स्वत: सावरलं. क्रोएशियन लोकांचा एकीकडे संघर्ष सुरु होता तरीही फुटबॉल या खेळाप्रती असलेली त्यांची आवड कमी झाली नाही हे विशेष... युगोस्लावियाचा भाग असताना या देशात मोठ्या प्रमाणात फुटबॉल अकादमी होत्या. क्रोएशिया स्वतंत्र झाल्यानंतर अनेक फुटबॉल अकादमी बंद झाल्या आणि क्रोएशियात नव्यानं फुटबॉल अकादमी सुरु झाल्या. स्वातंत्र्यानंतर क्रोएशियातील अनेक खेळाडू युरोपियन लीगमधून खेळू लागले आणि आपल्या कामगिरीची छाप सोडू लागले. याचमुळे त्यांनी १९९८ मध्ये विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली. 


एका बाजूला देश सावरत होता त्याचवेळी देशात विवध फुटबॉल लीग आणि स्पर्धा मूळ धरू लागत होत्या. याचंच फळ या विश्वचषकात त्यांना मिळालं... अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्वासाठी झगडाव्या लागणाऱ्या या देशानं फुटबॉल विश्वचषकात आपलं अस्तित्व अधिकच ठळक केलं आहे, असंच म्हणावं लागेल.