Afghanistan Crisis : तालिबानमधली परिस्थिती हाताबाहेर, देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर तुफान गर्दी
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर केलेल्या गोळीबारात पाच जण ठार
अफगाणिस्तान : अफगाणिस्तानवर (Afganistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमधली परिस्थिती बिकट बनली आहे. तालिबान्यांनी अफगणिस्तानाचा ताबा घेतल्यानंतर देश सोडून दुसरीकडे जाण्याचे नागरिकांचे प्रयत्न सुरु झालेत. त्यामुळे काबुल एअरपोर्टवर (Kabul Airport) तुफान गर्दी झालीय. विमानात चढण्यासाठी अक्षरश: झुंबड उडलीय. प्रत्येक जण विमानात घुसण्याचा प्रयत्न करतोय.
कोणतीही वस्तू न घेता लोक देश सोडून पळून जात आहेत. काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे, त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिकन सैन्याचा गोळीबार
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन सैनिकांना (American Army) वेळोवेळी हवेत गोळीबार करावा लागत आहे. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाल्याची माहिती मिळतेय.
एअर इंडियाने हवाई मार्गात केला बदल
तालिबानने अफगाणिस्तानमधील हवाई क्षेत्र बंद केलं आहे. यामुळे दिल्ली ते काबूल दरम्यानची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने आपल्या शिकागो-दिल्ली हवाई मार्गातही बदल केला असून यूएईकडून वळवला आहे. शिकागो-दिल्ली विमान इंधन भरण्यासाठी शारजा इथं उतरेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर विमान दिल्लीसाठी रवाना होईल. त्यामुळे अफगाण हवाई क्षेत्राचा वापर होणार नाही.