जगाला धोका : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या २० वर्षात येणार भयंकर पूर
गेली काही वर्षे महापूरांनी जगभरात अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे.
नवी दिल्ली : गेली काही वर्षे महापूरांनी जगभरात अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे.
हवामान बदल
जागतिक हवामान बदल आणि तापमानवाढ हे कायम चर्चेत असणारे विषय. त्याची दखल घेतली जातेय ही एक सकारात्मक गोष्ट आहे. जगभरात निसर्गचक्रात मोठे बदल घडत आहेत. हवामान बदलाचा पृथ्वीच्या वातावरणावर मोठाच परिणाम होतो आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांसाठी अनेक घटक कारणीभूत ठरतायेत. प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, विषारी वायूंची वातावरणातील वाढती पातळी यासारख्या कारणामुळे पर्यावरणावर मोठे घातक परिणाम होत आहेत.
भारतालाही धोका
अमेरिकेतल्या संशोधनानुसार येणाऱ्या २० वर्षात जगभरात महाभयंकर पूर येणार आहेत. यात लाखो लोकांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. हे पूर मुख्यत्वे करून अमेरिका, भारत, आफ्रिका आणि मध्य युरोपात येणार आहेत. त्यातून मोठीच आपत्ती मानवजातीवर येणार आहे. सध्या येणारे पूरसुद्धा प्रचंड विध्वंसक आहेत. यावरून भविष्यात येणाऱ्या महाप्रलयकारी पूरांचा आपल्याला अंदाज येईल.
महाविध्वंस
जागतिक तापमानवाढीचा दर २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यात य़श आलं तरच पर्यावरणातले बदल आटोक्यात येणार आहेत. त्यातच पृथ्वीवर मानवी लोकसंख्या सातत्याने वाढते आहे. नदीकाठावर असलेली गावं किंवा शहरं फुगत चालली आहेत. त्यामुळे संशोधनात वर्तवल्या गेलेल्या आर्थिक आणि जीविताच्या नुकसानापेक्षा होणारं नुकसान कितीतरी पटीने अधिक असू शकतं.