७५ वर्षात पहिल्यांदा यूएन महासभेला एकत्र नाही येणार जगभरातील नेते
कोरोनामुळे यंदा जगभरातील नेते एकत्र येणं कठीण
मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटाने जगातील जनजीवन पूर्णपणे बदलले आहेत. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात होणारी संयुक्त राष्ट्र महासभा देखील या वर्षी होणं कठीण वाटत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस म्हणाले की, जगातील नेत्यांनी यावर्षी महासभेला येणे अशक्य आहे, जे 75 वर्षांत प्रथमच होत आहे.
संयुक्त राष्ट्रांचे तिजानी मुहम्मद म्हणाले की, 193 देशांच्या नेत्यांनी आपलं संबोधन यूएनला नक्की द्यावे. अशी त्यांची अपेक्षा आहे. पण यावेळी त्यांना न्यूयॉर्कमध्ये येऊन महासभेत भाग घेणे कठीण आहे.
ते म्हणाले की, अध्यक्ष किंवा नेता कधीही एकटा येत नाही. त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण प्रतिनिधीमंडळ देखील न्यूयॉर्कला येतं. पण आता ते शक्य नाही. पुढे काय होतं बघुया. पण आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं.
संयुक्त राष्ट्र संघटना यावर्षी त्यांच्या 75 व्या वर्ष साजरं करणार होते. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नेत्यांना आवाहन केले आहे की, सर्व जण आपले रेकॉर्ड केलेले संदेश यूएनला पाठवू शकतात.
दुसरीकडे, तिजानी मुहम्मद म्हणाले की, 'संयुक्त राष्ट्रांमध्ये आम्ही फक्त शंभर लोकांना प्रवेश देऊ शकतो. सर्वसाधारण परिस्थितीत ही संख्या हजारोंमध्ये असते. यावर्षी अधिक लोकं येण्याची अपेक्षा होती, कारण उत्सव मोठा होणार होता.' पण कोरोनामुळे ते शक्य होणं कठीण आहे.
विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या महामारीमुळे आतापर्यंत चार लाख लोकांचा बळी गेला आहे, तर जवळपास 70 लाख लोकांना याची लागण झाली आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांची एक महासभा असते, जिथे जगभरातील नेते आपला अजेंडा मांडतात.