लंडन : संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी आपले आयुष्य वेचले. तसेच गरिबीचे उच्चाटन कसे करता येईल, यावर भर दिला. गरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात, कसे आणता येईल यादृष्टीने त्यांनी  समाजकार्य केले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोफी अन्नान हे १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ असा प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९३८ रोजी झाला. गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समूहाची स्थापना केली. 


कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. १९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी डब्ल्यूएचओ या संस्थेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरु केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले.