Trending News In Marathi: कधी कधी मुलं अभ्यास करण्यासाठी कंटाळा करतात तेव्हा पालक मुलांना दटावून अभ्यासाला बसवतात. मात्र, भारताच्या शेजारच्या देशात चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा होमवर्क करत असताना वडिलांनी त्याला मारले. मात्र, वडिलांचा तो फटका मुलाच्या वर्मी बसला यामुळं त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. जर, वडिलांच्या विरोधात पोलीस रिपोर्ट केला गेला असता तर कमीत कमी तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकला असता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलाला होमवर्क करताना गणितासंदर्भातील एक प्रश्न अडला होता. त्याच्या वडिलांनी अनेकदा समजावूनही त्याला तो प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळं वडिल त्याच्यावर नाराज झाले. कित्येकदा समजावून सांगूनही त्याला हा प्रश्न सोडवता न आल्यामुळं वडील त्याच्यावर रागावले आणि अचानक घरात ठेवलेले डाळिंबाचे फळ फेकून त्याच्यावर मारले. वडिलांनी डाळिंब फेकून मारल्यानंतर काही काळ मुलगा वेदनेने कळवळत होता. मात्र, काहीवेळाने तो ठिक झाला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याची आई ऑफिसमध्ये होती. 


मुलाला मार लागल्यानंतरही त्याच्या शरीरावर काहीच जखमा दिसून आल्या नव्हत्या त्या दिवशी तो व्यवस्थीत होता. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशी मुलाची हालत खुप जास्त बिघडली होती. त्याला पोटात असह्य वेदना होत होत्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला आहे. वडिलांनी डाळिंब फेकून मारल्यानंतर त्याचा जोरदार फटका मुलाच्या यकृतावर बसला. यकृताला रक्तपुरवठा करणारी  रक्तवाहिनी फुटली होती. त्यामुळं मोठी गंभीर इजा झाली होती. वेळेतच शस्त्रक्रिया केली गेली नसती तर कदाचित मुलाचा जीव वाचवणेही शक्य झाले नसते. 


दरम्यान, चीनमध्ये निष्काळजीपणामुळं गंभीर दुखापत झाल्यास त्या व्यक्तीला 3 वर्षांचा कारावास होऊ शकतो. एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत घरगुती हिंसाचारच्या आधारे घटनेकडे पाहिले जाते. पीडित कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांत तक्रार केली नसली तरी, एकदा का असे वर्तन संस्था किंवा व्यक्तींकडून आढळून आले की, त्यांचीही तक्रार करण्याची जबाबदारी आहे. कायद्यासमोर प्रत्येकजण समान आहे. या अंतर्गंत कुटुंबातील सदस्यांमधील संबंध लक्षात न घेता घरगुती हिंसाचार हा गुन्हा आहे.