गोष्ट Wagner ची | पुतिन यांच्या कट्टर शत्रूच्या वॅगनर आर्मीचा कणाच गुन्हेगारी; जाणून घ्या रक्तरंजित इतिहास
Wagner Group : रशियामध्ये खाजगी लष्करी गट तयार करणे आणि चालवणे यावर बंदी आहे. तरीही प्रिगोझिनने वॅगनर बांधले आणि तेव्हापासून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालवले. त्याने रशियन सैन्यासोबत युद्धही केले आहे.
Wagner Group History : युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या वॅगनर ग्रुपच्या (Wagner Group) बंडानंतर रशियामध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित केले आहे. वॅगनर ग्रुपने रशियाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे पुतीन यांनी म्हटलं आहे. वॅगनर ग्रुपने रशियन सैन्याविरुद्ध युद्ध घोषित केल्यानंतर, पुतिन यांनी याला विश्वासघात म्हटले आहे. दुसरीकडे वॅगनर ग्रुपचे सैन्य रशियाच्या सीमा ओलांडून रोस्तोव्हपर्यंत पोहोचले आहे. या बंडानंतर रशियाने 'वॅगनर ग्रुप'चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिनविरुद्ध (Yevgeny Prigozhin) अटक वॉरंट जारी केले आहे.
2014 मध्ये रशियन सैन्याला क्रिमियाचा ताबा घेण्यात मदत केल्यानंतर वॅगनर ग्रुप उजेडात आला होता. तेव्हापासून वॅगनर ग्रुपचे नाव मोझांबिक, लिबिया, सीरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, माली, सुदान आणि मादागास्कर सारख्या देशांमध्येही ऐकू येऊ लागले आहे. यापैकी बरेच देश हे सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहेत. वॅगनर ग्रुपचे प्रमुख काम हे अनागोंदी माजलेल्या देशांमध्ये लढाऊ आणि प्रशिक्षित सैन्य पाठवून मदत करणं हेच आहे. त्याच्या बदल्यात त्यांना भरपूर पैसे मिळतात. सीरियात तेल विहिरींचा ताबा घेतल्याच्या बदल्यात या वॅगनर ग्रुपला एकूण उत्पादनाच्या 25 टक्के रक्कम मिळाली होती.
कोणी केली स्थापना?
मात्र अनेक वर्षे वॅगनर ग्रुप काय आहे कुठे याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. अनेकांना असे काही अस्तित्वात आहे याची कल्पना देखील नव्हती. वॅगनर ग्रुप चालवण्या मागे दोन लोक असल्याची माहिती कधीकाळी पुढे आली होती. एक म्हणजे रशियाच्या लष्करी गुप्तचर संस्था GRU मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून काम केलेले दिमित्री उत्कीन आणि दुसरे म्हणजे येवगेनी प्रोगोझिन. उत्किन हे हिटलरला आपला आदर्श मानता. हिटलरचा आवडता संगीतकार रिचर्ड वॅगनर होता. त्यामुळे असे म्हटले जाते की उत्कीनने या संघटनेला वॅगनर ग्रुप असं नाव दिले. तर दुसरे प्रमुख म्हणजे येवगेनी प्रोगोझिन. येवगेनी हे या ग्रुपला आर्थिक मदत पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.
2019 मध्ये, पुतिन यांना याबाबत विचारले असता त्यांनी काही खाजगी सुरक्षा कंपन्या यात काम करत आहेत. पण त्याचा रशियाच्य सरकारशी काहीही संबंध नाही, असे म्हटलं होतं. त्यानंतर 2022 युक्रेनवर हल्ला झाला तेव्हा रशियन सैन्याने कच खाल्ल्यानंतर वॅगनर ग्रुपने आघाडी घेत अनेक ठिकाणं आपल्या ताब्यात घेतली होती.
वॅगनर ग्रुपकडे सैन्य किती?
माध्यमांच्या वृत्तानुसार, वॅगनर ग्रुपमध्ये किमान 50,000 सैनिक आहेत. यातील बहुतांश हे पूर्वाश्रमीचे कैदी आहेत. त्यांना रशियातील तुरुंगातून या ग्रुपमध्ये भरती करण्यात आले. प्रीगोझिन यांनी रशियातील तुरुंगाना हेलिकॉप्टरने भेट देत या कैदी असलेल्या सैनिकांची निवड केली आणि त्या ग्रुपमध्ये सामील करुन घेतले.
मात्र हे सर्व पुतिन यांच्या संमतीशिवाय शक्य नव्हते. वॅगनर ग्रुप आणि पुतिन यांच्यातील संबंध बराच काळ लपवून ठेवण्यात आले होते. यापूर्वी हा ग्रुप आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत गुप्त लष्करी गट म्हणून काम करत होता. मग रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्व काही बदलले. येवगेनी प्रोगोझिन यांनी उघडपणे कबूल केले की वॅगनर ग्रुप तयार केला आणि चालवला जात आहे. आता हा गट रशियन सैन्यापेक्षा अधिक वरचढ ठरत आहे. वॅगनरला संरक्षण मंत्रालयाकडून दारूगोळ्याचा पुरवठा होत होता.