घरात अचानक लिक होतो गॅस! एका आठवड्यात `या` शहरात 16 जण दगावले
Gas Leak in Balochistan: मागील आठवडाभरापासून गॅल लिक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
Gas Leak in Balochistan: पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या (Balochistan) नैऋत्येला असलेल्या क्वेटा शहरामध्ये मागील एका आठवड्यापासून गॅस लिकच्या (Gas Leak) घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गॅस लिकच्या घटनांमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी क्वेटामधील किल्ली बडेजाई परिसरामध्ये गॅस लिक होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गॅस लिक झाल्याने झालेल्या स्फोटामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत.
आधी गॅस लिक आणि मग स्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलं झोपलेली असताना हा स्फोट झाला. आधी गॅस लिक झाल्याने तो घरामध्ये साचून राहिला आणि नंतर स्फोट झाला. या स्फोटामुळे मातीचं बांधकाम असलेल्या या घराच्या भिंती पडल्या. अन्य एका घटनेत क्वेटामध्येच एका घरात गॅस लिक झाल्याने एका पोलीस उप-निरिक्षकाचा मृत्यू झाला.
अनेकजण बेशुद्ध
पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बातम्यांना दुजोरा दिला आहे. मागील आठवड्याभरात अनेकदा गॅस लिक झाल्याच्या घटनांबद्दलची तक्रार आमच्याकडे आली आहे असं पोलीस म्हणाले. या घटनांमध्ये 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 लोक या अपघांमध्ये बेशुद्ध पडले असून त्यांना उपचारांची गरज लागल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गॅसचं लोडशेडिंग
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गॅसचा पुरवठा नियंत्रित नसून त्यामध्येही वीजेप्रमाणे लोडशेडिंगचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळेच गॅस लीकेजच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये आर्थिक संकटामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडित होतं, दैनंदिन वस्तूंचा तुटवडा यासारख्या समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागत आहे. असं असतानाच आता या नव्या समस्येचीही भर पडली आहे.
आर्थिक संकटाशी कनेक्शन
केवळ क्वेटाच नाही तर आजूबाजूच्या परिसारामध्येही अशा घटना घडत आहेत. जियारत आणि कलात परिसरामध्येही अशा घटना घडल्यात. बलूचिस्तानमध्ये मागील एका महिन्यापासून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळेच गॅसचा वापर वाढला आहे. एकीकडे गॅसची मागणी वाढली असतानाच दुसरीकडे अर्थिक संकटामुळ गॅसचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात केला जात नाही. त्यामुळेच पाइपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या गॅसचा दबाव नियंत्रित करण्यात अडचणी येत असून त्यामधूनच गॅस लिकसारख्या घटना वाढल्या आहेत. दुसरीकडे सिलेंडरमध्ये भरुन विकल्या जाणाऱ्या गॅसचा काळाबाजार वाढला आहे. सध्या पोलिसांनी या वेगवेगळ्या घटनांची अपघाती मृत्यू अशी नोंद करुन घेतली असून पुढील तपास करत आहेत. मात्र या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचं वातावरण आहे.