कोलंबो : वांगी, कारली - १६०, भेंडी, टोमॅटो - २००, कोबी - २४०, बीन्स - ३२० आणि मिरची - ७०० ही काही नग संख्या नाही तर हे आहेत प्रति किलो भाज्यांचे दर.. या दराने नागरिकांना भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. हा भाज्यांचा दर आहे एकेकाळी सोन्याची लंका अशी बिरुदावली मिरविणाऱ्या श्रीलंका देशात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या देशातील खाण्या-पिण्याच्या गोष्टींच्या किंमतीत १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याचा धूर निघणाऱ्या श्रीलंका देशातील नागरिकांना सध्या वाफाळता चहा घेणेही अत्यंत मुश्किल झाले आहे.


श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येण्यास कारणीभूत आहे ते विदेशी विशेषतः चीनकडून घेतलेले कर्ज. चीनचे श्रीलंकेवर ५ अब्ज डॉलर्सचे कर्ज होते. तर, गेल्या वर्षी, देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीलंकेने चीनकडून आणखी १ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. 


पुढील 12 महिन्यांत श्रीलंकेला देशी आणि विदेशी कर्ज फेडण्यासाठी सुमारे $७.७ अब्ज डॉलरची गरज आहे. $500 दशलक्ष किमतीचे आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोखे जानेवारीमध्ये भरायचे आहेत. या रकमेची पूर्तता कशी होणार या विवंचनेत असतानाच आता देशासमोर महागाईचे संकटही उभे ठाकले आहे. विशेषत: भाजीपाला आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


सध्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती आभाळाला भिडलेल्या दिसून येत आहेत. यामुळे सामान्य जनता हैराण झालीय. भाज्या-फळभाज्यांच्या किंमतींतही वाढ झाल्यानं सामान्य नागरिकांना काय खावं? असा प्रश्न पडलाय.


का झाली ही अवस्था? 
कोरोनामुळे देशातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला.
वाढलेला सरकारी खर्च आणि कर कपातीमुळे परिस्थिती आणखी वाईट
चीनचे कर्ज फेडताना श्रीलंकेचे कंबरडे मोडले. 
देशातील परकीय चलनाचा साठा एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
देशांतर्गत कर्जे आणि विदेशी रोखे फेडण्यासाठी सरकारला पैसे छापावे लागतात.