भारतामध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ; मोदींचे जागतिक गुंतवणुकदारांना आवाहन
सध्याच्या घडीला भारतामध्ये पायाभूत क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक होत असल्याकडेही मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
न्यूयॉर्क: केंद्र सरकारने कंपनी करात केलेल्या लक्षणीय कपातीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जागतिक गुंतवणुकदारांना साद घातली. ते बुधवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ब्लुमबर्ग जागतिक उद्योग परिषदेच्या व्यासपीठावर बोलत होते. यावेळी मोदींनी म्हटले की, आमच्या सरकारने भारतातील कंपनी करात ऐतिहासिक अशी कपात केली आहे. त्यामुळे जागतिक उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याचे मोदींनी सांगितले.
तुम्हाला चांगल्या पातळीच्या बाजारपेठेत गुंतवणूक करायची असेल, तुमच्या स्टार्टअपसाठी मोठी बाजारपेठ हवी असेल, पायाभूत सुविधांचे विशाल जाळे उपलब्ध असणारा देश हवा असेल, तर तुम्ही भारतामध्ये या, असे मोदींनी जागतिक उद्योजकांना सांगितले. सध्याच्या घडीला भारतामध्ये पायाभूत क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक होत असल्याकडेही मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करात ऐतिहासिक कपात जाहीर केली होती. यामुळे सेस आणि अधिभार मिळून कंपनी कराची रक्कम २५.१७ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. यापूर्वी हा कर तब्बल ३२ टक्क्यांच्या घरात होता. याशिवाय, ऑक्टोबरपासून पुढे नोंदल्या गेलेल्या आणि मार्च २०२३ पर्यंत उत्पादन सुरू करू शकणाऱ्या कंपन्यांना फक्त १७.०१ टक्के इतकाच कर द्यावा लागणार आहे.
हा निर्णय घेऊन मोदी सरकारने भारताला कर आकारणीच्या दृष्टीकोनातून जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या बरोबरीला आणून ठेवले होते. या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारातही मोठी उसळी पाहायला मिळाली होती. त्यामुळे भांडवली बाजारातील गुंतवणुकदारांच्या संपत्तीत अवघ्या एका तासात दोन लाख कोटी रुपयांची भर पडली होती.