घरात बसून करावं तरी काय, वाचा गुगलने दिलं या प्रश्नाचं उत्तर
तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
मुंबई : जगभरात Coronavirus कोरोना व्हायरसचं थैमान वाढतच असतानाच आता प्रत्येकानेच या व्हायरसशी लढण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक देश या व्हायरसशी लढा देत आहे. आपल्या परिने उपाययोजना राबवत आहे. या साऱ्यामध्येच देशभरातील प्रमुखांचे आणि आरोग्य यंत्रणांचे अविरत प्रयत्न पाहता थेट गुगलकडूनही त्यांना सहकार्य करण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसशी लढा देत असलाना अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. बरेच व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीमध्ये इतके दिवस नेमकं काय करायचं हाच प्रश्न काहींच्या मनात घर करु लागला आहे. अमुक एका काळानंतर लॉकडाऊनदरम्यान काही प्रमाणात चीडचीड होणं स्वाभाविक आहे. पण, आता आम्ही करावं तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचंही उत्तर थेट गुगलनेच दिलं आहे.
असंख्य प्रश्न आणि शंकांचं निरसन करणाऱ्या गुगलने याही प्रश्नाचं उत्तर देत थेट कलात्मक डूडलच साकारलं आहे. Google या शब्दांमध्ये या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. अतिशय मोठ्या अशा या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही पूस्तकं वाचू शकता, काही वाद्य वाजवू आणि शिकू शकता, व्यायामाची सवय अंगी बाणवू शकता, आप्तजनांशी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधू शकता किंवा इतरही बऱ्याच मार्गांनी स्वत:ला या काळात अनेक कामांमध्ये गुंतवून ठेवू शकता असं या खास डूडलमधून सांगण्यात आलं आहे.
विलगीकरणाच्या या काळात स्वत:मधील कलागुणांना वाव देण्याची एक चांगली संधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे घराबाहेर न पडता तुम्ही कोरोनाला हरवू शकता आणि घरातच राहून तुम्ही एक व्यक्ती म्हणून स्वत: काही नवे गुण अंगी बाणवू शकता असा संदेश गुगलनेही दिला आहे.
जगभरात कोरोनाची दहशत
चीनच्या वुहान शहरातून सुरुवात झाल्या कोरोनाच्या दहशतीने आता जगातील जवळपास १७५हून अधिक देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. हजारोंच्या संख्येने लोकांना या व्हायरसमुळए मृत्यू झाला आहे. अद्यापही या व्हायरसवर उपाय म्हणून लस मिळालेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या बळावरच त्याच्याशी लढा दिला जात आहे. ज्याकरता सर्वत्र लॉकडाऊन करत नागरिकांना त्यांच्या घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.