मुंबई : अफगाणिस्तानवर पुर्णपणे कब्जा केल्यानंतर तालिबान बंडखोरांनी रविवारी मध्यरात्री सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तालिबान बंडखोरांच्या या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. तालिबान लढाऊंनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान काबूलमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करत आहे. याच दरम्यान या परिस्थितीनंतर भारत सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूलमध्ये परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. काबूलमध्ये तालिबानच्या प्रवेशानंतर परिस्थिती खूपच खराब झाली असल्याने विमानांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या दिल्लीहून काबूलला जाण्याच्या वेळेत बदल केला आहे. एअर इंडियाचे विमान आता रात्री 8.30 ऐवजी 12.30 वाजता उड्डाण करणार आहे.


काबूलमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये भारत सरकार सतर्क आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. काबूलमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने 2 एअर इंडिया विमानांना अलर्टवर ठेवलं आहे.


दरम्यान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबान बंडखोरांच्या प्रवेशानंतर हजारो लोकांती गर्दी काबूल विमानतळावर दिसत आहेत. अनेक देशांमधील राजकारणी व्यक्तींना काबूल विमानतळावरून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय. अशातच विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे विमानतळावर लोकांची पळापळ सुरू होती. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.


काबूलमधील अमेरिकन दूतावासाजवळ देखील दोन मोठे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात कोणी जखमी किंवा ठार झालं आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लपण्यास सांगितलं आहे.