टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमधील शाळेत भीषण गोळीबार झाल्याची घटना समोर आलीये. या हल्ल्यामध्ये 18 मुलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. इतकंच नव्हे तर 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या गव्हर्नरने याबाबत माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी गोळीबाराची घटना टेक्सासमधील उवाल्डे शहरात घडल्याची माहिती दिलीये. याठिकाणी 18 वर्षीय शूटरने रॉब एलिमेंटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या. 


गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि तीन शिक्षकांनाही आपला जीव गमवावा लागला. आरोपी शूटरने हल्ला केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. 


या 18 वर्षीय शूटरने अचानक शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केला. पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ फोर्स घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी मुलांच्या पालकांना कॅम्पसमध्ये न जाण्याचं आवाहन केलं गेलं.



ग्रेग अॅबॉट यांनी हा हल्ला धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. या आरोपी शूटरने दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना लक्ष्य केलं. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून जखमींना रुग्णालयात उपचार दिले जातायत. 


मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती आहे. सध्या राज्यपालांच्या आदेशानंतर टेक्सासच्या रेंजर्सनी या प्रकरणाची चौकशी सुरू केलीये. स्थानिक पोलिसांकडूनही सहकार्य घेतले जात आहे.