हाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये
जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.
इस्लामाबाद : जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. काहीच दिवसांपुर्वी हाफिज सईदला नजरबंदीतून बाहेर काढण्यात आलं होतं. यानंतर भारतानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती.
अमेरिकेचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानला इशारा दिला होता. हाफिज सईदला सोडल्यामुळे अमेरिका-पाकिस्तानमधल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले होते.
सईदचा पाकिस्तान सरकारवर निशाणा
२४ नोव्हेंबरला सुटका केल्यानंतर हाफिजनं पाकिस्तान सरकारवरही निशाणा साधला होता. पाकिस्तान सरकारनं दुसऱ्या देशांचे सल्ले न घेता स्वत: निर्णय घेतला पाहिजे, असं सईद म्हणाला होता. अमेरिका आणि भारताच्या दबावामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं वक्तव्य हाफिजनं केलं होतं.
काश्मिरींसोबत विश्वासघात केल्यामुळे नवाज शरीफ यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी झाली होती. शरीफना भारताबरोबर मैत्री करायची होती, त्यामुळे त्यांनी काश्मीरच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोपही सईदनं केला होता. काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत लढतच राहु असं हाफिज म्हणाला होता.