मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिजला पाकचा दणका, संघटनेवर बंदी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याला पाकिस्तानने जोरदार दणका दिला आहे.
इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याला पाकिस्तानने जोरदार दणका दिला आहे. त्याच्या उद-दावा या दहशतवादी संघटनेवर भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने बंदी घातली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत ही बंदी घातली आहे. जमात उद-दावासोबतचा हाफिज सईदच्याच फलाह-ए इन्सानियत या संस्थेवर देखील बंदी घालण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचे जोरदार धाबे दणाणले आहेत.
पाकिस्तानात मसूद अझरच्या भावासहीत ४४ दहशतवाद्यांना अटक
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानने हाफिज सईद याच्या जमात उद-दावा या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली. भारताने पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला होता. जोपर्यंत दहशतवादाला पायबंदी घालण्यात येत नाही. तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतीही बोलणी होणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, भारताने आधी दहशतवाद थांबवा नंतर बोलणीचे बघू, असे उत्तर दिले होते. तसेच बालाकोट हल्यानंतर पाकिस्तानवर मोठा दबाव आला होता. तर अमेरिकेने लादेनच्या मुलाविरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.
पाकिस्तानने जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी घातलेल्या संघटनेच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त हाती आले आहे. जगातून वाढदिलेल्या दबावानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पाऊल उचलले आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाला प्रोत्साहन मिळता कामा नये आणि दहशतवाद्यांविरोधात सरकारने कारवाई करावी असा जगभरातून दबाव वाढत आहे.