...तर मुशर्रफ यांचं प्रेत ३ दिवस चौकात टांगून ठेवा - कोर्ट
मुशर्रफ यांना देहदंडाची शिक्षा सुनावली आहे.
इस्लामाबाद : "मुशर्रफ जीवंत सापडले नाहीत तर त्यांचं प्रेत पाकिस्तानात आणा. इस्लामाबादच्या डी-चौकामध्ये ३ दिवस हे प्रेत टांगून ठेवा." हे उद्गार कुण्या जहाल अतिरेक्याचे नाहीत. ही वाक्यं आहेत मुशर्रफ यांच्या निकालपत्रातली. पाकिस्तानात एका विशेष न्यायालयानं देशद्रोहाच्या आरोपात मुशर्रफ यांना देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. ३ न्यायाधीशांच्या या पीठाचं १६७ पानी आदेशपत्र इंटरनेटवर टाकण्यात आलं आहे. या पीठाचे प्रमुख न्यायाधीश वकार अहमद सेठ यांनी हा धक्कादायक फैसला सुनावला आहे.
फरार दोषीला कायद्यानुसार शिक्षा व्हावी, यासाठी यंत्रणांनी कसोशीनं प्रयत्न करण्याचे निर्देश आम्ही देत आहोत. मात्र शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्यांच्या मृत्यू झाला असेल तर मृतदेह खेचत घेऊन या आणि इस्लामाबादच्या डी-चौकामध्ये तीन दिवसांपर्यंत टांगून ठेवा. असं या आदेशात म्हटलं आहे.
सध्या दुबईमध्ये उपचार घेत असलेले मुशर्रफ परत येणारच नाहीत, असं बोललं जातं आहे. त्यामुळे या निकालाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही कमीच आहे. स्वतः मुशर्रफ यांनी केवळ वैयक्तिक आकसातून हा निकाल दिल्याचा आऱोप केला आहे.
मरणानंतर वैर संपतं, असं भारतीय संस्कृती सांगते. मात्र अद्याप मध्ययुगीन मानसिकतेत असलेल्या पाकिस्तानसारख्या देशांना हे मान्य नसावं. लोक ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतात, त्या कोर्टानंही अशी खुनशी भाषा वापरावी यातच सगळं आलं.