वॉशिंग्टन: अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथे मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएनएन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पाण्यात अनेक वाहने पूर्णपणे बुडाली आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राष्ट्रीय हवामान सेवेने या भागात आपातकालीन परिस्थिती जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पोटोमॅक नदीला मोठा पूर आलाय. या पुरात अनेकजण अडकून पडले आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाकडून रस्त्यावरील गाड्यांमध्ये आणि नदीपात्रालगत असलेल्या घरांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. 


ग्रेट फॉल्स, व्हर्जिनिया, मेरीलँड, अलेक्झांड्रिया व्हीए आणि कोलंबियाच्या काही परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय, वादळी वाऱ्यांमुळे या भागातील हवाईसेवाही जवळपास ठप्प झाली आहे. 




मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शहरी भागातील लहान खाड्या आणि ओढ्यांना पूर आला आहे. परिणामी सखल भागांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याचे वृत्तही सीएनएनने दिले आहे. 


अमेरिकेतील पूर परिस्थितीदरम्यान अनेक लोकांचे गाडीत अडकून मृत्यू होतात. त्यामुळे रस्ता पाण्याखाली गेलेल्या परिसरात वाहने घेऊन जाऊ नये, असा सल्लाही राष्ट्रीय हवामान सेवेने दिला आहे. 


काही दिवसांपूर्वी मुंबईतही मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी सखल भागांमध्ये पाणी साचून मुंबईची वाहतूक व्यवस्था आणि जनजीवन ठप्प झाले होते. तसेच शॉक लागून आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता.