38 Crore+ Lawsuit Against Employer: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील न्यूयॉर्क सार्वजनिक वाचनालयामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने या वाचनालयाविरोधात तब्बल 38.82 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. आपल्याबरोबर कामाच्या ठिकाणी भेदभाव केला जातो असा या कर्मचाऱ्याचा आरोप आहे. हा कर्मचारी 6.2 फूट उंच असून त्याचं वजन 163 किलो इतकं आहे. असं असतानाही आपल्याला पुरणार नाही असा डेस्क कामासाठी देण्यात आल्याचा आरोप या कर्मचाऱ्याने केला आहे. विल्यम मार्टीन असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विल्यम हा न्यूयॉर्क सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम असलेल्या स्टॅव्हरोस नार्चोज फाऊंडेशनच्या ग्रंथालयामध्ये माहिती सहाय्यक म्हणून काम करतो. आपल्याला देण्यात येणाऱ्या या त्रासामुळे मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या निर्माण झाल्याचा दावा मार्टिनने केला आहे. मार्टिनला या साऱ्याचा त्रास ऑक्टोबर 2021 पासून सुरु झाला जेव्हा त्याच्या कामाची जागा बदलण्यात आली. नव्या जागी असणारी रचना ही आपल्या शरीरयष्टीला शोभणारी नव्हती त्यामुळे आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागतोय असा मार्टिनचा दावा आहे. "माझ्या शरीराच्या आकाराप्रमाणे मला मोकळेपणे बसता येईल असा डेस्क द्यावा एवढीच माझी मागणी होती," असा दावा मार्टिनने ब्रुकलीन फेड्रल कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. 'न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार सुटसुटीत डेस्क देण्याची त्याची मागणी वेळोवेळी फेटाळली गेली, नाकारण्यात आली त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 


प्रश्न सुटला पण नंतर पुन्हा...


मार्टिन ज्या कामागार संघटनेत आहे त्यांनीही यामध्ये लक्ष घातलं आणि त्याला थोडा सुटसुटीत डेस्क मिळाला. मात्र जून 2023 रोजी नवीन सहाय्यक निर्देशक रुजू झाले तेव्हा त्यांनी पुन्हा मार्टिनला त्याच छोट्या डेस्कवर बसण्याचे निर्देश दिले. एवढ्यावरच प्रकरण न थांबता मार्टिनवर कामाच्या वेळेस झोपा काढण्याचा आरोप करण्यात आला आणि त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं. मात्र आपण असं काहीही केलं नसल्याचा मार्टिनचा दावा आहे. सर्व आरोप खोटे असून आपल्यावर कारवाई करण्याच्या हेतूने करण्यात आल्याचं मार्टिनचं म्हणणं आहे. आपल्याला बदली देण्यात यावी किंवा मेडिकल लिव्हवर पाठवावं अशीही मागणी त्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं कारण देत केली. 


वाचनालयाचं म्हणणं काय?


"मला कामावर जावं लागेल याचा विचार करुनही भिती वाटते," असं म्हणत मार्टिनने आपल्यावर या साऱ्या प्रकाराचा मोठा मानसिक परिणाम झाल्याचा दावा केला आहे. मात्र न्यूयॉर्क सार्वजनिक वाचनालयाने मार्टिनचे आरोप फेटाळून लावले आहेत. दाखल करण्यात आलेल्या खटल्यात काहीच दम आणि तथ्य नसल्याचं वाचनालयाचं म्हणणं आहे. लवकरच या प्रकरणात कोर्टात सुनावणी होणार आहे.